Breaking News

विल्यमसन, टेलरच्या खेळीमुळे न्यूझीलंडचा बांगलादेशवर नाट्यमय विजय

वेलिंग्टन, दि. 16 - बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंडने बांगलादेशवर 7 गडी राखून विजय मिळवला आणि दोन सामन्यांच्या  मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. केन विल्यमसनचे शतक (नाबाद 104) आणि रॉस टेलरच्या 60 धावांच्या जोरावर न्यूझीलंडने हा सामना जिंकला.
या कसोटीचा पाचवा दिवस अतिशय नाट्यमय ठरला. बांगलादेशने पहिल्या डावात 56 धावांची आघाडी घेतली होती.   साकीब अल हसन आणि मोमीनुल हक  यांनी आज 3 बाद 66 या धावसंख्येवरून डावाला सुरूवात केली. न्यूझीलंडच्या भेदक मा-यापुढे बांगलादेशच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. पहिल्या डावात द्विशतक  ठोकणारा साकीब शून्यावर बाद झाला. पाठोपाठ मोमीनुलही 23 धावांवर परतला. सब्बीर रहमान (50) आणि मुश्फीकूर रहीम (13) दोघांनी डाव सावरला, पण  मुश्फीकूरच्या मानेला चेंडू लागल्याने तो मैदानाबाहेर गेला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी तळाच्या फलंदाजांना झटपट बाद करुन बांगलादेशचा डाव 160 धावात  गुंडाळला. बोल्टने 3, सॅन्टनर आणि वॅग्नरने प्रत्येकी 2 तर साऊदीने 1 बळी टिपला. इमरूल कयास आणि मुश्फीखूर रहीम दोघांनाही दुखापतीमुळे मैदानाबाहेर  जावे लागले.
217 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचे सलामीवीर स्वस्तात बाद झाले. कर्णधार विल्यमसन आणि रॉस टेलर यांनी अनुभवी खेळ केला.  विल्यमसन 90 चेंडूत नाबाद 104 धावा केल्या. टेलरने (60) त्याला चांगली साथ दिली. पहिल्या डावात 177 धावा करून फॉलोऑन वाचवणा-या न्यूझीलंडच्या  टॉम लॅथमला सामनावीर घोषित करण्यात आले.