Breaking News

देशसेवेची भावना सैनिकांना देते लढण्याचे बळ ः डी. बी. शेकटकर

पुणे, दि. 30 - सैन्यामध्ये कार्यरत असताना 1971 साली झालेल्या युद्धात मी मृत्यूशी झुंज देऊन पुन्हा आलो. ते फक्त देशसेवेच्या भावनेमुळेच. देशसेवेची भावना सैनिकांना मृत्यूशी लढण्याचे बळ देते. सैन्यात काम केल्यामुळे सैनिकांची परिस्थिती आणि त्यांचा त्याग मी अनुभवला आहे. त्यामुळे देशासाठी लढताना जो त्याग सैनिक करतात त्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे, असे मत लेफ्टनंट जनरल ( निवृत्त) डी.बी. शेकटकर यांनी व्यक्त केले.
वानवडी येथील वीरस्मृती या वास्तूच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वीरस्मृती सुवर्णमहोत्सव कृतज्ञता समिती व सैनिक मित्र परिवारतर्फे वीरपत्नी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, लेफ्टनंट (निवृत्त) कर्नल बिपीन शिंदे, पुणे कॅन्टोमेंट बोर्डचे उपाध्यक्ष दिलीप गिरमकर, पुणे कॅन्टोमेंट बोर्डचे सदस्य विनोद मथुरावाला, सैनिक मित्र परिवारचे अध्यक्ष अशोक मेहंदळे, उपाध्यक्ष आनंद सराफ, समितीचे खंडेराव जठार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी 26 वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला.
डी.बी. शेकटकर म्हणाले की, देशसेवेचे काम इमानदारीने केल्यास आपण सैन्यदलासह इतर कोणत्याही क्षेत्रात उच्च पदापर्यंत पोहचू शकतो. देशसेवा हा धर्म मानून सैनिक सीमेवर आणि अंतर्गत सुरक्षेकरिता काम करतात. त्यामुळे आजच्या तरुणाईने त्यांचा आदर्श घ्यायला हवा. आनंद सराफ म्हणाले की, हुतात्मा आणि वीर जवानांच्या कुटुंबीयांना मायेची सावली देण्यासाठी 1967 साली वीरस्मृती या वास्तूची पायाभरणी करण्यात आली. बलिदान व त्यागाचे प्रतिक असलेल्या या वास्तूच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त राष्ट्राकरिता प्राण अर्पण करणार्‍या सैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यापुढेही सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी परिवारातर्फे विविध कार्यक्रम केले जाणार आहेत.
प्रा. दत्तात्रय बांदल यांनी सूत्रसंचालन केले. अनिल जीमन यांनी प्रास्ताविक केले. सुनील मोरे, संतोष गोरे, अनिल गोरे, अजय मोरे, शिवाजी जगताप यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.