Breaking News

मोबाईलमुळे संसार संशायास्पद झाला आहे ः सिंधुताई सपकाळ

पुणे, दि. 30 - सध्याचे जग सोशल मीडियाचे जग असून सगळ्यांकडे मोबाईल फोन आले आहेत.  नवरा बायकोचा मोबाईल फोन तपासतो, तर बायको नवर्‍याचा मोबाईल तपासते. संशयाने मने पछाडली आहेत. उघडे डोळे ठेऊन संसाराकाडे बघितले पाहिजे. त्यामुळे एकमेकांकडे संशयाने न पाहाता, एकमेकांची काळजी घेऊन संसार केला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका तथा सन्मती बाल निकेतन संस्थेच्या अध्यक्षा सिंधुताई सपकाळ (माई) यांनी आज (रविवारी) चिंचवड येथे व्यक्त केले. तसेच महिला आहेत, तर देश आहे, असेही त्या म्हणाल्या.
चिंचवड येथील एम्पायर इस्टेट ज्येष्ठ नागरिक संघाचा आठवा वर्धापन एम्पायर इस्टेट येथील क्लब हाऊस तीनमध्ये साजरा करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी साहित्यिक राजेंद्र कोरे होते. यावेळी माजी महापौर अनिता फरांदे, नगरसेविका शमिम पठाण, माजी नगरसेवक काळूराम पवार, संघाचे अध्यक्ष लक्ष्मण हुकेरी, सचिव डॉ. हिंदुराव मोहिते, कोषाध्यक्ष अनिल नलावडे, कार्याध्यक्ष विजय मराठे, उपाध्यक्ष सुभाष व्होरा, उपसचिव श्रीकांत पत्की, मंदा संगमुळी, विनय क्षेत्रमाडे, उदय तवकर, लाजवंती तावराणी, सुनंदा बाहेती, डॉ. जयप्रकाश अगरवाल आदी उपस्थित होते.
सिंधुताई सपकाळ म्हणाल्या की, ‘संसार करत असताना अनेकदा काटे मध्ये येत असतात. काट्याचे स्वागत करून काट्याशी मैत्री केली गेली पाहिजे. संसारातील काटा हळूवारपणे बाहेर काढून संसार फुलविला पाहिजे. पतीने पत्नीचे कौतुक केले पाहिजे. कौतुकामुळे पत्नीला बळ येते, आनंद मिळतो. महिला आहेत तर देश आहे. महिला खचल्या तर देश खचेल. त्यामुळे महिलांची खूप गरज असून महिलांच्या कामाचे कौतुक केले गेले पाहिजे’.
‘ज्येष्ठांकडे अनुभवांची शिदोरी असते. सध्याच्या तरुणांना मार्गदर्शनाची गरज आहे. लहान वयातही मुले प्रेमात पडत आहेत. तरुणांनी ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे, असे सांगत सिंधुताई सपकाळ यांनी त्यांच्या जीवनातील अनुभव सांगितले. मी चिंचवड रेल्वे स्टेशन आणि मराठवाड्यातील नांदेड येथील पूर्णा रेल्वे स्थानकावर जास्त भिक मागितली आहे. मराठवाड्यातील लोकांनी मला खूप मदत केली असून मराठवाड्या सारखा देता नाही. पूर्णा  रेल्वे स्थानकाने माझा नुकताच सत्कार केला, याचा मला मनस्वी आनंद होत आहे. लोकांच्या मुलांची आई होण्यासाठी मी माझी मुलगी दत्तक दिली. नवर्‍याने मला सोडले म्हणून मी समाजसेवा करू शकले. त्यामुळे मी आत्ता नवर्‍याचा सांभाळ करून त्याची आई झाले आहे’, असेही सिंधुताई सपकाळ म्हणाल्या.
राजेंद्र कोरे म्हणाले की, ‘सिंधू नदी पाकिस्तानमध्ये गेली आहे. मात्र, सिंधुताईच्या रुपाने समाजसेवेची नदी आपल्याला मिळाली आहे. सिंधुताईंनी अनाथांचे जीवन फुलवले. मातीचा सुंगध म्हणजे सिंधुताई सपकाळ आहेत.
यावेळी एम्पायर इस्टेट येथील नागरिकांनी सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेला 1 लाख 30 हजार रुपयांची देणगी दिली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती पांडे यांनी केले.