Breaking News

जळगावला सादर होणार संघ परिवाराची वाटचाल सांगणारे महानाट्य

जळगाव, दि. 03 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रारंभाची वाटचाल उलगडणारे महानाट्य ‘हम करे राष्ट्र आराधन’ हे जळगाव शहरात 29 जानेवारीला  सादर होणार आहे. या महानाट्याचे आयोजन भारत विकास परिषद, जळगाव शाखेने केले आहे.
रास्वसं, त्याची शिस्त, विचारधारा आणि त्यांच्या सामाजिक कार्याविषयी समाजातील विविध घटकांना नेहमी उत्सुकता असते. देशभरात कुठेही नैसर्गिक आपत्ती  अथवा संकट उद्भवले की बचाव अथवा पूनर्वसनाचे काम करताना दिसतात. विविध सामाजिक घटकांसाठी समाजोपयोगी प्रकल्प संघाच्या इतर शाखांमार्फत सुरू  असतात. देशाशी संबंधित अनेक विषयांवर संघाची भूमिका सुस्पष्ट व राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारी असते. अशा या संघाची सविस्तर ओळख करुन घेण्याची  संधी जळगावकर आणि जिल्हावासियांना उपलब्ध होते आहे.
‘हम करे राष्ट्र आराधन’ हे महानाट्य नागपूर येथील महालक्ष्मी प्रॉडक्शन या संस्थेने निर्मित केले आहे. यात 35 कलावंतांचा सहभाग आहे. महानाट्य हे हिंदी  भाषेत आहे. हे महानाट्य 29 जानेवारीला सायंकाळी 7 वाजता ए. ची. झांबरे विद्यालयाच्या प्रांगणात सादर होणार आहे.
या महानाट्यात संघाच्या स्थापनेपासून (सन 1925) तर सन 1973 पर्यंतच्या काळातील प्रवासाची माहिती देण्यात आली आहे. संघाचे संस्थापक तथा पहिले  सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार (1 एप्रिल 1889  ते 21 जून 1940) आणि द्वितीय सरसंघचालक माधव गोळवलकर तथा गोळवलकर गुरुजी (सन  1940ते 1973)  यांच्या काळातील संघाची वाटचाल, विस्तार, कार्य याचे वर्णन करण्यात आले आहे. गेल्या दीड वर्षांत या महानाट्याचे अनेक प्रयोग झाले आहेत.
संघाचे संस्थापक तथा पहिले सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांचा संघ स्थापनेचा उद्देश, कार्य आणि गोळवलकर गुरुजी यांची राष्ट्र निर्माण कार्याची प्रेरणा, कृती,  सहभाग, पुढाकार याची झलक या महानाट्यातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. भावी पिढीने शिक्षणानंतर रोजगार, उद्योग व्यापार अथवा व्यवसाय करीत राष्ट्र  निर्माण कार्यातही सहभाग द्यावा, वेळ द्यावा या हेतूने या महानाट्याची निर्मिती करण्यात आली आहे. हे महानाट्य हजारो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरुन संघ  विचाराचा प्रवाह अधिक गतिमान व परिणामकारक करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कधीही चुकवू नये अशा गुणवत्तेचे हे महानाट्य जळगावकरांनी व  जिल्हावासियांनी पाहावे असेच आहे.