Breaking News

दहा महापालिकांच्या निवडणुका फेब्रुवारीत : सहारिया

मुंबई, दि. 09 - राज्यात होणार्‍या 10 महानगरपालिकांच्या निवडणुका या फेब्रुवारी महिन्यात होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली. जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुका मुदत संपण्यापूर्वी घेणं आवश्यक आहे. मात्र, मार्च महिन्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा असल्यानं निवडणुका फेब्रुवारीमध्ये घेण्यात येणार असल्याचं सहारिया यांनी स्पष्ट केलं आहे.
निवडणूक आयोगानं त्यासाठी तयारीही पूर्ण केल्याची माहिती त्यांनी दिली. महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या असून पुढील काही दिवसात याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. निवडणुकांचे बिगुल येत्या काही दिवसात वाजत असले, तरी शिवसेना, भाजप, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांच्यात युती-आघाडी होण्याबाबत कुठलाही ठोस निर्णय अद्याप झालेला नाही.
अर्थसंकल्पापूर्वी पाच राज्यांच्या निवडणुका असून सरकार अर्थसंकल्पात घोषणा करुन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल, असा आक्षेप शिवसेनेसह विरोधकांनी घेतला होता. त्यामुळे विरोधकांनी निवडणुकीनंतर अर्थसंकल्प सादर करण्याची मागणी करत निवडणूक आयोगाकडेही धाव घेतली होती. निवडणूक आयोगाने विरोधकांच्या मागणीला उत्तर द्या, अशी सुचना सरकारला केली होती. मात्र आता राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होईल, यावर शिक्कामोर्तब झालं आहे.