Breaking News

गांधींचा फोटो हटवणं म्हणजे मोदींची हुकूमशाहीकडे वाटचाल : शिवसेना

मुंबई, दि. 13 - खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडर आणि डायरीवर महात्मा गांधींऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं छायाचित्र छापल्याने, भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने टीका केली आहे. नरेंद्र मोदींची हुकूमशाहीकडे वाटचाल असल्याचा घणाघात शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी केला आहे. अडसूळ म्हणाले की, महात्मा गांधी आदर्श असल्याचं मोदी म्हणतात. पण आदर्शालाच नष्ट करणं दुर्दैवी आहे. नोटाबंदी निर्णयाच्या वेळी मंत्रिमंडळाला विश्‍वासात न घेणं, रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरलाच कल्पना न देणं, कोणतीही पूर्वतयारी न केल्याने जनतेला मनस्ताप झाला, हे हुकूमशाहीचं प्रतिक आहे.
देशभर खादीचा प्रचार, प्रसार आणि उत्पादन करणार्‍या खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडर आणि डायरीवरुन महात्मा गांधी यांचे छायाचित्र हटवून त्या जागी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापण्यात आलं. मात्र या प्रकाराचा सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे. तसंच सामाजिक क्षेत्रातही नाराजी व्यक्त केली जात आहे.
गांधी खेळणं नाही, कधीही उचलावं आणि बाजूला काढावं. खादीची चळवळ गांधीजींनी सुरु केली होती. मोदींच्या आकलनाचीच कमाल वाटते. चरखा म्हणजे गांधी  असं ते समजतात. पण चरखा स्वावलंबनाचं प्रतिक होतं. मोदींनी स्वावलंबनाविषयी बोलू नये. जो मनुष्य स्वत: दहा लाखाचे कपडे घालतो, त्याने साधेपणा आणि  गांधींबद्दल बोलणं यासारखा दुसरा विकार नाही. हे मनोविकाराचं लक्षण असल्याचं मला वाटतं, अशा तीव्र शब्दात सामाजिक कार्यकर्ते विश्‍वंभर चौधरी यांनी निषेध  केला आहे.