राजकारणातील ‘जाणता’
दि. 06, डिसेंबर - समाजकारण असो नाही तर राजकारण सर्वच पातळीवर सर्व अंगाने जाण असलेली फार थोडी माणस महाराष्ट्रात उरलीत.त्यात शरद पवार यांचे नाव अगदी पहिल्या क्रमांकावर घ्यावे लागेल, या आमच्या मताशी शरद पवार यांचे पारंपारिक राजकीय प्रतिस्पर्धीही सहमत असतील.शरद पवार कुठल्या पक्षाचे किंबहूना कुठल्या पक्षाचे राजकारण करतात हा मुद्दा इथे महत्वाचा नाही.तर शरद पवार यांना असलेली तळमळ त्याहूनही त्यांना असलेली जाण अधिक महत्वाची आहे.विद्यमान राजकीय अन् सामाजिक परिस्थितीत तेच अधिक महत्वाचे आहे. शरद पवार यांनी आपल्या सार्वजनिक आयुष्यात जे काही मिळवलं त्यापेक्षा समाजकारण आणि राजकारण क्षेञाला त्यांनी खुप काही दिले आहे. समाजकारणात निर्माण झालेल्या प्रत्येक आणीबाणीच्या क्षणी दिशा दाखविणारा नेता म्हणून शरद पवार समाजमान्य आहेत.राजकारणात तर शरद पवार यांना भिष्मच मानले गेले आहे.राजकारण कसे करायचे, समाजकारण आणि राजकारणात किती जाडीची भिंत असावी,हे दोन्ही ’कारण’ कुठल्या कारणासाठी एकञ आणायचे,कुठला समाज नेता,राजकीय पुढारी कुठल्या पातळीवर किती अंतरावर ठेवायचा, याचा अचूक अंदाज शरद पवार यांच्या इतका अन्य कुणा नेत्याला आहे असे म्हणणे मोठे धाडस करण्यासारखे होईल.केंद्रात किंवा राज्यात कुठल्या राजकीय पक्षाची किंवा राजकीय गटाची सत्ता आहे याचा शरद पवार यांच्या एकूणच कार्यशैलीवर कुठलाच परिणाम झालेला दिसत नाही.शरद पवार यांच्या मुत्सुद्दीगीरीमुळे त्यांच्या नुसत्या अस्तित्वानेही रणांगणातून पळ काढणारे जसे आहेत तसेच त्यांना धडा शिकवू म्हणत स्वतःचे तोंड फोडून घेणारेही राजकारणात आहेत.ज्याने त्याने आपल्या परीने शरद पवार यांना नामोहरम करण्याचा कसोशीने प्रयत्न केला.शरद पवार यांच्यावर या सर्व घडामोडींचा काय परिणाम झाला हे सर्वश्रूतच आहे.शरद पवार यांनी या सर्वांना यथेच्छ खेळवत समाजकारण आणि राजकारणाचा मनमुराद आनंद लुटला. शरद पवार यांनी राजकारणाच्या सीमा ओलांडून सर्वांशीच मैत्रीपूर्ण संबंध जपतांना काही मंडळींशी जाणीवपुर्वक निर्माण केलेले स्नेहबंध या मागे आहे.हे वेगळे सांगण्याची गरज आहे.काळाची गरज ओळखून सर्वांनीच शरद पवार यांना चुचकारण्याचा प्रयत्न केलाय. म्हणूनच शरद पवार हे राजकारणातील ’जाणता’आहे मोदींसारख्यांनाही सांगण्याचा मोह आवरत नाही.