Breaking News

जिथे फिल ह्यूज गेला, त्याच मैदानात रेनशॉच्या हेल्मेटवर चेंडू आदळला!

सिडनी, दि. 03 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील तिसर्‍या कसोटी सामन्यात उपस्थित प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मॅट रेनशॉनं सिडनीत आपल्या चौथ्याच कसोटीत खेळताना शतक साजरं केलं. पण या खेळीदरम्यान, मोठी दुखापत होता होता तो बालंबाल बचावला.
रेनशॉ 91 धावांवर खेळत असताना, पाकिस्तानच्या मोहम्मद आमिरचा चेंडू त्याच्या हेल्मेटवर आदळला. त्या आघातानं हडबडून गेलेला रेनशॉ खाली पडल्यानं  क्षणभर सर्वांच्या काळजाचा ठोकाच चुकला. कारण सिडनीच्या याच मैदानात दोन वर्षांपूर्वी झालेल्या शेफिल्ड सामन्यात फिल ह्यूजच्या डोक्यावर चेंडू आदळून  त्याचा दुर्दैवी अंत झाला होता. पण मॅट रेनशॉ काही क्षणांतच स्वत:च्या पायावर उठून उभा राहिला आणि उभय संघांमधल्या खेळाडूंनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला.