प. पू. सेवागिरी महाराजांच्या रथावर 51 लाखांची देणगी अर्पण
पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपर्यातून येणार्या भक्तांमध्ये दरवर्षी वाढ होत आहे. यंदा रथोत्सवाला 10 लाखांहून अधिक भाविकांनी हजेरी लावली. राज्यभर पर्जन्यमान चांगले झाले असल्याने शेतकर्यांसह सर्व स्तरातील लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाविकांनी 5, 10, 20, 50, 100 तसेच नवीन 500 आणि दोन हजारांच्या नोटांच्या माळा रथावर अर्पण केल्या.
प. पू. श्री सेवागिरी महाराजांच्या रथोत्सवादरम्यान भाविकांनी रथावर अर्पण केलेल्या सर्व नोटांच्या माळा, परदेशी चलन एकत्र करण्यात आले. पोलीस बंदोबस्तात सर्व रक्कम नारायणगिरी भक्त निवासात नेण्यात आली. रात्री 11 वाजल्यापासून देवस्थानचे मठाधिपती प. पू. सुंदरगिरी महाराज, चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, प्रताप जाधव, योगेश देशमुख, रणधीर जाधव, सुरेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पुसेगाव येथील बँकांचे अधिकारी-कर्मचारी व ग्रामस्थांच्या मदतीने देणगीची रक्कम मोजण्यात आली. देणगीची रक्कम मोजण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, यशवंत पतसंस्था, न्यू सातारा समूह, कराड अर्बन, मायणी अर्बन, ज्ञानदीप को-ऑप बँक, सेवागिरी पतसंस्था, सिध्दनाथ, शिवकृपा, शिवशक्ती पतसंस्था, कराड मर्चंट, विविध पतपेढ्यांसह विविध संस्थांचे अधिकारी हजर होते.