युवकच भारताला महासत्ता बनवतील ः काकाशेठ नय्यर
। उद्योजक गुलशन धुप्पड यांच्या हस्ते उद्घाटन व पारितोषिक समारंभ
अहमदनगर, दि. 31 - विद्यार्थ्यांनी आपले आई-वडील, शिक्षक व आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा सन्मान करावा. देश घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा. आपल्या कलागुणांचा उपयोग देश घडविण्यासाठी करावा. प्रत्येकाकडे काही उपजत कलागुण असतात. या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे काम शिक्षक व पालक करीत असतात. जीवन जगताना योगाच्या अभ्यासाला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. भारत हा महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. भारतात युवकांची संख्या मोठी असून, हा युवकच भारताला महासत्ता बनवतील, असे प्रतिपादन काकाशेठ नय्यर यांनी केले.दुर्गादेवी अमरचंद नय्यर विद्या मंदिर व श्रीमान बिशंभरदास अमरचंद नय्यर माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक गुलशन धुप्पड यांच्या हस्ते करून पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी काकाशेठ नय्यर बोलत होते.यावेळी नगरसेवक संपत बारस्कर, काकाशेठ नय्यर, बाळासाहेब पवार, रेवजी पवार, बापूराव आंधळे, बी. एन. गोरे, श्रीधर पवार, बारस्कर, सातपुते सर, बाबासाहेब शिंदे, मुख्याध्यापक श्रीकृष्ण पवार, मंदा हांडे, औटी, एकनाथ मोटे, आदिनाथ घुगरकर उपस्थित होते. प्रास्ताविक श्रीकृष्ण पवार यांनी केले. वार्षिक अहवाल वाचन मुख्याध्यापिका मंदा हांडे यांनी केले. याप्रसंगी नगरसेवक संपत बारस्कर यांच्या हस्ते उमलत्या कळ्या या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.नय्यर पुढे म्हणाले की, आपले आई-वडील आपल्यावर प्रेम करतात. त्याप्रमाणे आपण मोठे झाल्यावर त्यांच्यावर प्रेम करा. त्यांना वृद्धाश्रमात पाठवू नका. त्यांची सेवा करा. यामध्ये जीवनाचे खरे सार्थक आहे. आई-वडिलांची सेवा करून आपले जीवन अधिक आनंदी व सुखी बनवा, असे ते म्हणाले. बाळासाहेब पवार म्हणाले की, मुलांमधील कलागुणांना वाव दिल्यास त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकास होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे आवश्यक आहे. मुलांनीही अशा प्रकारच्या कार्यक्रमांतून उत्स्फूर्त सहभाग घेतला पाहिजे.संपत बारस्कर म्हणाले की, पूर्वीचे शिक्षण व आता मिळणारे शिक्षण यात आमूलाग्र बदल झाले आहेत. शिक्षण क्षेत्रात झालेले हे बदल खर्या अर्थाईने देश घडविण्यासाठी उपयुक्त आहेत, असे ते म्हणाले. सूत्रसंचालन वाघ व कसोटे मॅडम यांनी केले, तर आभार मुरकुटे मॅडम यांनी मानले.