Breaking News

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी यासाठी रविवारी खंडोबाला साकडे

पुणे, दि. 22 - न्यायालयाने बैलाच्या शर्यती, प्रदर्शन व प्रशिक्षण याच्यावरील बंदी उठवावी, यासाठी अखिल भारतीय बैलगाडा मालक संघटनेच्या वतीने रविवारी  (दि. 25) निमगाव दावडी येथील मंदीरात श्री खंडोबाला साकडे घालण्यात येणार आहे. 
हा कार्यक्रम सकाळी 10.00 वाजता होणार असून यावेळी जिल्ह्यातील सर्व खासदार व आजी-माजी आमदार,  सर्व पदाधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत,  अशी माहिती आण्णासाहेब भेगडे, भीमाशंकर बोडके, रामकृष्ण टाकळकर, मुकुंद बोर्‍हाडे, अनिल लांडगे, अजित गायकवाड, परमेश्‍वर चौधरी, संपत खेडकर,  विलास थोरात, प्रकाश कबाडी, विशाल तोत्रे, बाळासाहेब आरुडे, सुनील गुजर, हिरामण परदेशी यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयामध्ये 7 डिसेंबर रोजी बैलगाडा शर्यतीवरील बंदीची अंतिम सुनावणी झाली. सलग तीन वर्षे ही बंदी कायम ठेवल्यामुळे शेतकरी, बैलगाडामालक  आणि बैलगाडा शर्यती शौकीन यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्राणी मित्र संघटना व अ‍ॅनिमल वेलफेअर बोर्ड यांना न्यायालयाने वेळ न देता  शेतकरी हिताचा विचार करून ही बंदी उठवावी, मागणी अखिल भारतीय बैलगाडा मालक संघटनेच्या वतीने हे साकडे घालण्यात येणार आहे.
बैलांच्या शर्यतीवरील बंदी उठवली जावी, म्हणून सामाजिक, राजकीय व सांप्रदाय क्षेत्रातील विशेष बैलगाडा मालक, बैलगाडा शौकीन मंडळी, छोटे-मोठे  व्यावसायिक या सर्वांनी न्यायालयाचा अवमान न करता शांततेच्या मार्गाने यासाठी प्रयत्न करावेत व त्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे खंडोबा मंदिरात उपस्थित रहावे,  असे आवाहन अखिल भारतीय बैलगाडा मालक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.