Breaking News

दमदार पावसामुळे हागणदारीमुक्ती होण्यास गती

सातारा, दि. 29 (प्रतिनिधी) : गत तीन वर्षात सातारा जिल्ह्याच्या विविध भागातील जनता पिण्याच्या पाण्यासाठी कोसो दूर पायपिट करत होती. तसेच काही  भागातील जनता टँकरच्या पाण्यावर अवलंबून होती. मात्र, मे-जून महिन्यात मान्सूनपूर्व व मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने सातारा जिल्ह्यात  डोळेझाक होत असलेल्या हागणदारीमुक्त जिल्हा करण्याच्या कामास गती आली.
ग्रामस्वच्छता अभियानाची संकल्पना राज्यभर अंमलात आणण्यास सुरुवात झाल्यापासून सातारा जिल्ह्याने मोठे योगदान दिले आहे. ह्या योजना गावा-गावात  राबवित असताना लोकांना त्याचे महत्व पटवून देण्याची गरज असते. यासाठी त्या-त्या भागातील लोकांकडे वेळ, पैसा तसेच योजना काय आहे हे जाणून घेण्याची  मानसिकता असायला हवी असते. हागणदारी मुक्त गाव ही संकल्पना दरवर्षी नवनवीन माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे. गेल्या  तीन वर्षाच्या कालावधीत सातारा जिल्ह्यात दुष्काळाचे सावट होते. अशा परिस्थितीमध्ये गावातील लोक जनावरांच्या चारा छावण्या तसेच पिण्याच्या पाण्यासाठी  भटकंती करत असल्याचे पहावयास मिळत होते. त्यामुळे हागणदारीमुक्तीच्या उपक्रमास गती येवू शकली नव्हती. शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी शासनाकडून  मिळणारे अनुदान थेट लाभधारकाच्या बँक खात्यात जमा करणे तसेच या अभियानास गती येण्यासाठी प्रसंगी अनुदानात वाढ करण्याच्या शासनाच्या धोरणाबाबत  माहिती देण्यासाठी शासनाचे अधिकारी गावो-गावी येत होते. मात्र, ग्रामस्थ पिण्याचे पाणी तसेच जनावरांच्या चार्‍याच्या शोधात चारा छावणी तसेच चारा  खरेदीसाठी परगावी जात असल्याने शौचालयाच्या बांधण्याच्या संख्येत वाढ होऊ शकली नव्हती. मे-जून महिन्यात मान्सूनपूर्व व मान्सूनच्या पावसाने दमदार  हजेरी लावली. तसेच सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील लोकांनी दुष्काळ ही एक संधी समजून उपलब्ध पाण्याच्या सदुपयोग करून कांदा, बटाटा, झेंडू,  मिरची यासारखी कमी कालावधीची नगदी पिके घेऊन  चांगलाच पैसा जमा केला. तर पाऊस पडल्यानंतर उर्वरित जिल्ह्यातील लोकांनी पिण्याच्या तसेच शौचालय  बांधकामासाठी पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे शौचालयाच्या बांधकामास सुरुवात केली. त्यामुळे सातारा जिल्हा हागणदारीमुक्त करण्यात यश आले.