Breaking News

सातारा जिल्ह्यातील शाळा आयएसओ मानांकनाच्या दिशेने वाटचाल

सातारा, दि. 29 (प्रतिनिधी) : प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने दिलेल्या उद्दिष्टानुसार सातारा जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा जानेवारीअखेर  आयएसओ मानांकीत करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना शैक्षणिक गुणवत्ता कक्षाचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.  दरम्यान, सातारा जिल्हा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमात मागे न राहता तो राज्यात अग्रेसर राहिल, असे प्रयत्न अधिकार्‍यांनी करावेत, अशा सूचना जिल्हा  परिषदेचे शिक्षण सभापती सतीश चव्हाण यांनी दिल्या.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम सन 2016 व 17 अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक स्थायी समितीच्या सभागृहात झाली. बैठकीस शिक्षण  सभापती सतीश चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास कुलाळ, प्राचार्या डॉ. व्ही. जी. गणबावले, प्राथमिक  शिक्षणाधिकारी सौ. पुनीता गुरव, निरंतर शिक्षणाधिकारी एस. एस. पुन्ने, प्राचार्य आर. व्ही, शेजवळ, प्राचार्य जाधव, प्राचार्य आर. एस. भिंगारदेवे शिक्षण तज्ज्ञ सौ.  मंदा आष्टेकर, प्रमोद वायदंडे, अनिल बाबर, शंकर देवरे, मच्छिंद्र मुळीक, दीपक भुजबळ, उपशिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
शाळानिहाय श्रेणीकरण अहवालात ज्या शाळा ब श्रेणीमध्ये आहेत त्या शाळा 15 जानेवारीपर्यंत अ श्रेणीत येण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. तसेच क श्रेणीत एकही  शाळा राहणार नाही, याची दक्षता अधिकारी व शिक्षकांनी घ्यावी. जिल्ह्यात स्थलांतरित उसतोड कामगारांची मुले व वीटभट्टीवरील शाळा बाह्यमुले मोठ्या प्रमाणात  आढळून येत आहेत. ही मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या आवश्यकतेनुसार शाळा भरवण्याच्या सूचना डॉ. देशमुख यांनी दिल्या.
यावेळी संकलित मूल्यमापन चाचणी 1 नुसार तालुक्यातील शाळा व केंद्राचे श्रेणीनिहाय वर्गीकरण, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत 25 निकषानुसार प्रगत  शाळांचा आढावा, सातारा जिल्हा परिषदेने राबविलेल्या स्मार्ट व प्रगत शाळा गुणांकन, दत्तक शाळा भेटी आढावा व फलनिष्पत्ती, रिझल्ट फ्रेमवर्क डाक्युमेंट  गुणांकन, क्षेत्रभेटीचा आढावा, आधारकार्ड, इंग्रजी माध्यम व खाजगी प्राथमिक शाळातून जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा आढावा, पटातील  तफावत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान, प्राथमिक शिक्षण विभागाच्या सातारा जिल्हा तक्रार निवारण समितीची बैठक मुख्य कार्यकारी  अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत बालकांच्या तक्रारीचे निवारणाची चर्चा झाली. बैठकीस माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास  लाळ, प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनीता गुरव, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य वसुंधरा गणबावले व सदस्य उपस्थित होते.