Breaking News

जिहे-कटापूर योजनेला निधी दिला जाईल : ना. जानकर

सातारा, दि. 29 (प्रतिनिधी) : दुष्काळी भागाचा कायमचा पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी जिहे-कटापूर योजनेला निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे  आश्‍वासन पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्सव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दिले.
पुसेगाव येथे सेवागिरी कृषी व पशु-पक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्सव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत  होते. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार मोहनराव कदम, आमदार आनंदराव पाटील, जल तज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे,  तहसीलदार सीमा होळकर, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, सेवागिरी ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, अशोक पाटील, किरण बर्गे, एल. एम. घाडगे यावेळी  उपस्थित होते.
शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी राज्य शासन विविध योजना राबवित असल्याचे सांगून जानकर म्हणाले, हे सरकार शेतकर्‍यांच्या हितासाठी काम करत आहे. येथील  एमआयडीसी लवकरात लवकर कशी सुरु होईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील तसेच फायुस्टार एमआयडीसी सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. पुसेगाव  तिर्थक्षेत्र ब वर्गात आहे. अ वर्गात येण्यासाठीचे निकष पूर्ण करुन अ वर्गात आल्यास 20 कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल.
शेतकर्‍यांनी शेतीबरोबर शेतीपुरक व्यवसायाकडे वळून आपली आर्थिक उन्नती करावी, असे सांगून जानकर  म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान ही योजना  राहिली नसून आता लोकचळवळ बनली आहे. लोकांच्या सहभागामुळे ही योजना यशस्वी झाली आहे. पुसेगाव येथे जागा उपलब्ध झाल्यास पशुवैद्यकीय दवाखाना  सुरु करण्यात येईल. कराड विमानतळाबरोबर फलटण विमानतळाचा प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच कोरेगाव-पंढरपूर रेल्वेमार्गासाठी  प्रयत्न करण्यात येतील, असे आश्‍वासन त्यांनी शेवटी दिले.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, सेवागिरी ट्रस्टच्या माध्यमातून लोकोपयोगी चांगली कामे होत आहे या भागात एमआयडीसी मंजूर आहे. ही एमआयडीसी लवकर सुरु  झाली तर मोठ्या प्रमाणात येथील युवकांना रोजगार उपलब्ध होईल. जिहे-कठापूर योजनेला निधी उपलब्ध करुन दिल्यास दुष्काळी भागातील पाण्याचा कायमचा  प्रश्‍न मिटेल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार मोहनराव कदम, आमदार आनंदराव पाटील, जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास विविध विभागांचे शासकीय  अधिकारी, शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.