Breaking News

मिरजजवळ मोटार ऊस ट्रॉलीत घुसून 3 ठार

सांगली, दि. 29 - अंकलीहून मिरजमार्गे बेडगला (ता. मिरज) निघालेली मोटार ऊसाच्या ट्रॉलीत घुसल्याने तिघेजण जागीच ठार झाले तर एकजण जखमी झाला.  नंदकुमार चव्हाण (38), उदय परशराम पाटील (45, रा. बेडग) आणि दीपक जाधव (25, साळशिंगे, ता. खानापूर) अशी त्यांची नांवे आहेत. उदय विठ्ठल  कांबळे (32, बनपुरी, ता. आटपाडी) हा गंभीर जखमी झाला. त्याला मिरजेतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गणपतीपुळे येथे देवदर्शन करुन  परतताना मध्यरात्रीनंतर साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला.
अपघातातील मोटार (एमएच 10 एजी 1621) कोल्हापूरहून अंकलीत आल्यानंतर मिरजमार्गे बेडगला निघाली होती. मिरजेत मगदूम मळ्याजवळ रस्त्याकडेला  ऊसाने भरलेली ट्रॉली थांबली होती. भरधाव मोटारीची ट्रॉलीला जोरदार धडक बसली. मोटार ट्रॉलीत घुसली. धडक इतकी वेगवान होती, की मोटारीचा चक्काचूर  झाला. त्यात हे तिघे जागीच ठार झाले. चौघेही बंगळूरमध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा व्यापार करतात. आठ दिवसांच्या सुट्टीसाठी सर्वजण गावाकडे आले होते.  चौघेही गणपतीपुळ्याला गेले होते. तेथे दोन दिवस मुक्काम करुन काल सायंकाळी गावाकडे येण्यास निघाले. परतीचा प्रवास संपण्यास काही किलोमीटर बाकी  असतानाच अपघात झाला. त्यात तिघांना प्राण गमवावे लागले. या अपघातामुळे मिरज-कोल्हापूर रस्त्यावरील वाहतूक तासभर ठप्प झाली. मोटारीने जोरदार  धडक दिल्यानंतर ट्रॉली काही अंतरावर फरफटत जाऊन रस्त्यावर आडवी उभी राहिली. यामुळे दोन्ही बाजूच्या वाहनांची कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा  लागल्या. काही वेळातच पोलिस घटनास्थळी आले. पोलिस निरिक्षक राजू मोरे आणि इतर पोलिसांनी ऊसाच्या ट्रॉलीत अडकलेली मोटार बाहेर काढली. त्यानंतर  मोटारीतील मृतदेह बाहेर काढले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या उदय कांबळेला 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून मिरजेत खासगी रुग्णालयात दाखल  करण्यात आले. येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये तिघांचे शवविच्छेदन करण्यात आले. मृत नंदकुमार आणि उदय पाटील यांच्यावर दुपारी बेडग येथे अंत्यसंस्कार  करण्यात आले, दीपक जाधव यांचा मृतदेह साळशिंगे येथे पाठवण्यात आला.