Breaking News

ऊसाच्या ट्रॉलीचे चाकाखाली महिला जखमी

सांगली, दि. 29 - मिरज रस्त्यावर विश्रामबाग चौकात रस्त्याकडेला थांबलेल्या मोपेडला ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत महिला गंभीर जखमी झाली. तर त्यांचा तीन  वर्षाचा मुलगा पार्थ व वडील केवळ दैव बलवत्तर म्हणून वाचले. स्मिता प्रशांत पाटील (वय 31 रा. कन्हेरी ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे जखमी झालेल्या  महिलेचे नाव आहे. त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.  अपघात गङ्घस्त मोपेडचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर ट्रॅक्टर विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या सरंक्षण कठड्यावर जाऊन आदळला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने  ट्रॅक्टर जाग्यावरच साडून पळ काढला.
मूळचे वाळवा तालुक्यातील तुजारपूर येथील असणारे सर्जेराव कृष्णा पवार कामानिमीत्त मिरज मध्ये स्थायिक झाले आहेत. मंगळवारी दुपारी ते मुलगी स्मिता, नातू  पार्थ यांच्या बरोबर नव्या कोर्‍या मोपेडवरुन तुजारपूर हून मिरजेला निघाले होते. सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास ते विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या  जवळ आले.  विश्रामबाग चौकात सिग्नल पडल्याने त्यांनी मोपेड कडेला घेण्याची सूचना मुलगी स्मिता यांना केली. स्मिता यांनी मोपेड रस्त्याच्या कडेला  घेतल्यानंतर सर्जेराव पवार हे जवळच असणार्‍या महापालीकेच्या मुतारी मध्ये लघुशंका करण्यासाठी गेले. यावेळी सौ. स्मिता व त्यांचा मुलगा पार्थ हे मोपेडजवळ  थांबले. याचदरम्यान ऊसाच्या दोन ट्रॉली भरुन ट्रॅक्टर (एमएच 45 एफ 6171) मिरजकडे भरघाव वेगाने निघाला होता. विश्रामबाग चौकाजवळ आल्यानंतर  ट्रॅक्टर चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने रस्त्याकडेला उभारलेल्या सौ. स्मिता यांना ट्रॅक्टरने जोराची धडक दिली. त्यांना मोपेडसह फरफटत नेले. तर त्यांचा  मुलगा पार्थ हा ट्रॅक्टरच्या धडकेत उडून बाजूला पडला. यामुळे तो बचावला. तर सौ. स्मिता या ट्रॉलीच्या पुढच्या चाकाखाली सापडल्या. तर मोपेड ट्रॅक्टरच्या  मोठ्या चाकाखाली सापडून चक्काचूर झाली. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या सरंक्षण कठड्याला ट्रॅक्टर जाऊन धडकला. मुलगी व नातूला ट्रॅक्टरने धडक दिल्याने  सर्जेराव पवार यांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्याने विश्रामबाग पोलीस ठाण्यातील कर्मचारी, अधिकार्‍यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली.
पोलीस उपनिरक्षक सरोजनी पाटील यांनी अन्य कर्मचार्‍यांसह ट्रॉलीच्या चाकाखाली सापडलेल्या सौ. स्मिता यांना बाहेर काढण्यात आले. त्यांच्या कमेरेवरून  ट्रॉलीचे चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तात्काळ जवळच असणार्‍या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या अपघातांमुळे सांगली-मिरज रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. बघ्यांची मोठी गर्दी या  ठिकाणी जमली होती. पोलीसांनी तात्काळ दुसर्‍या एका ट्रॅक्टरच्या सहाय्याने अपघातगङ्घस्त ट्रॅक्टर व ट्रॉली बाजूला काढत केवळ अर्ध्या तासात वाहतूक सुरळीत  केली. अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने पळ काढल्याने ट्रॅक्टर चालकांबद्दल माहीती मिळू शकली नाही. या घटनेची विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली  आहे.