Breaking News

काळा पैसा गेला कुठे?

दि. 30, डिसेंबर - बेशिेबी मालमत्तेत, आणि काळा पैश्याने मोठयाप्रमाणात बाजारपेठ व्यापल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बाद केल्या  होत्या. तसेच जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी 50 दिवसांचा अवधी देखील देण्यात आला होता. या अवधीत काळा पैसा बँकामध्ये जाणार नाही, अशी  अटकळ बांधली जात होती. देशभरात चलनात असलेल्या हजार आणि पाचशेच्या नोटांचे मुल्य असलेल्या साडे पंधरा लाख कोटी रुपयांपैकी 14 लाख कोटी रुपये  बँकांकडे जमा झाले आहेत. रद्द करण्यात आलेल्या साडे पंधरा लाख कोटी रुपयांपैकी 3 लाख कोटी रुपये बँकांमध्ये जमा होणार नाही, असा केंद्र सरकारचा  अंदाज होता. मात्र तो चुकवत काळा पैसा पांढरा करत तो पैसा बँकात भरल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विमुद्रीकरणाचा प्रयोग फसला तर नाही ना, अशी  शंका आता निर्माण होत आहे. देशभरात सुरू असलेला गोंधळ बधता आणि बँकात जमा झालेला पैसा बघता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय यात  बरीच तफावत मिळते. 30 डिसेबंरनंतर पंतप्रधान मोदी अजून, त्यांच्या भात्यात असलेले कोणते अस्त्र काढतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. कारण नोटाबंदी  होण्यापूर्वी अनेकांनी आपल्या बँकात मोठया रकमा जमा केल्या आहेत. त्यांसबधी कोणतेच सुतोवाच करण्यात आलेले नाही. तसेच बँकात जमा झालेले 14 लाख  कोटी रुपयासंदर्भात मोदी सरकार कोणते धोरण स्वीकारते, हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण अनेकांनी काळा पैसा पांढरा करण्यात आला आहे, त्यांच्यावर  कारवाईचा कोणता बडगा उचलतील, हे महत्वाचे आहे. बेनामी संपत्तीवर टाच आणण्यासोबतच बँकामध्ये जमा होणार्‍या मोठया रकमा, यांचा स्त्रोत तपासून मोदी  सरकार कोणती कारवाई करणार हे लवकरच कळेल. नवीन वर्षांच्या पूर्वसंध्येला, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करणार आहे, त्याचवेळी पंतप्रधान  मोदी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराविरूद्धच्या लढाईला पाठबळ मिळणार आहे. मात्र भ्रष्टाचाराविरूद्ध लढाई लढत असतांना सामान्य  माणूस भरडणार तर नाही ना, याची काळजी देखील घेण्याची गरज आहे. जुन्या नोटा रद्द करण्यात आल्यानंतर अनेकांनी विविध शक्कल लढवत मोठया प्रमाणात  काळा पैसा पांढरा करण्यात यश मिळविले. काही बकरे सापडले, तर काही मोकाट आहेत. मात्र चलनकल्लोलाचा त्रास ग्रामीण भागातील जनतेला सर्वात मोठया  प्रमाणात बसला. शेतकरी वर्ग, ग्रामीण जनता, ज्यांना कॅशलेस व्यवहार काय असतो? तो कशासी खातात, हे ज्यांना माहीत नाही, त्यांची परवड होणारच. रोख  रकमेचा तुटवडा असल्यामुळे शेतीमालाचे भाव मोठया प्रमाणात घसरले. व्यापारी शेतीमाल पडलेल्या किमतीत मागु लागले. तीन वर्षांनतर यंदा पाणी पाऊस चांगला  असल्यामुळे अन्नधान्य, उत्पन्नात वाढ झाली, मात्र नोटाबंदीने पुन्हा आपण नागवले गेलो, अशी भीती शेतकर्‍यामध्ये निर्माण झाली. भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला  देशवासियांचा पाठिंबा आहेच, मात्र यातून मोठे धेंड सुटता कामा नये, त्यांची पळवाट कशी रोखता येईल, यासाठी निणय घेण्याची गरज आहे. अन्यथा नवीन  धोरणांमुळे पुन्हा काळा पैसा पांढरा करण्याची संधी मिळू नये एवढीच अपेक्षा.