Breaking News

पाच मोटारसायकलींसह चोरट्यास अटक

सांगली, दि. 29 - तासगाव पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत 1 लाख 67 हजार रुपये किंमतीच्या पाच मोटारसायकलींसह ढेबेवाडी (ता. पाटण) येथील  चोरट्याला पोलिसांनी अटक केली. दोन महिन्यात ही तिसरी मोठी कारवाई आहे.
उपविभागीय कृष्णात पिंगळे यांनी माहिती दिली, की तासगांव येथील मारुती राजाराम चव्हाण यांची मोटारसायकल (एमएच 10 सीडी 6967) ही हिरोहोंडा  मोटारसायकल 22 डिसेंबर रोजी चोरीला गेली होती. या चोरीचा तपास सुरु होता.
दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी बालाजी लक्ष्मण चव्हाण (24, बाजारतळ ढेबेवाडी, ता. पाटण, जि. सातारा) याला पोलिसांनी ताब्यात  घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मारुती चव्हाण यांची मोटारसायकल काढून दिली. चौकशीनंतर तो अट्टल मोटारसायकल चोरटा असल्याचे स्पष्ट  झाले. त्याच्याकडून विटा येथील इरफान रमजान शिकलगार यांची हिरोरोंडा फॅशन मोटारसायकल (किंमत 40 हजार रुपये) शिवाय कर्‍हाड, विटा येथून  चोरलेल्या बजाज पल्सर, हिरोहोंडा सीडी डिलक्स, अशा सुमारे 1 लाख 67 हजार रुपये किंमतीच्या 5 मोटारसायकली पोलिसांनी जप्त करुन ताब्यात घेतल्या.
पोलिस निरिक्षक मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक प्रदीप चौधरी, पोलिस नाईक शैलेंद्र कोरवी, हेमंतकुमार ओमासे, राजेंद्र भिंगारदेवे, सोमनाथ  गुंडे, दरिबा बंडगर, कुमार पाटील यांनी कारवाई केली.तासगाव पोलिसांनी दोन महिन्यांत मोटारसायकल चोरट्यांसह, एचटीपी चोरणारे चोरटे, लॅपटॉप, मोबाईल  चोरणारा चोरटा अशा मोठे गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळविले आहे.