Breaking News

अहमदनगरमधील जेलची भिंत फोडण्याचा प्रयत्न, तिघांवर गुन्हा

अहमदनगर, दि. 25 - नगर जिल्ह्यातील नेवासा कारागृहाची भिंत फोडण्याचा प्रयत्न सराईत गुन्हेगारांनी केला आहे. वेळीच प्रकार जेलमधील सुरक्षा कर्मचार्‍यांना कळल्यानं हा प्रयत्न फसला आहे. घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. भिंत फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगरमधील हे जेल फार जुनं आहे. तसंच जेलच्या भिंतीही कमकुवत झाल्या आहेत. त्यामुळे आरोपींना जेलची भिंत फोडण्याची शक्कल सुचली. जेलमधील दरवाजाच्या पट्ट्या व भिंती बर्‍याच कमकुवत झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी नवीन जेल उभारलं पाहिजे तसंच जेलमधील पडझड मोठ्या प्रमाणावर होत असल्यानं त्याची दुरुस्ती लगेच करणं गरजेचं असल्याचं पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी सांगितलं. तसंच त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचंही स्पष्ट झालं आहे. जेलमधील भिंतीचा काही भाग फोडण्यात आला आहे. त्याची माहिती मिळताच अधिकार्‍यांनी तातडीनं पाहणी करुन आरोपींवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी संदीप लवांडे, अमर पवार आणि मयूर आव्हाड या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.