Breaking News

समाजकारणाची राजकीय वेठबिगारी!

दि. 29, डिसेंबर - समाजकारण आणि राजकारण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत? हे दोन्ही क्षेञ पुर्णपणे वेगळे असून अस्तित्वही वेगळे असायला हवे? या दोन्ही क्षेत्रात वेगळेपण दर्शवणारी सिमा रेषा आहे? या सारखे असंख्य प्रश्‍न समाजाला अस्वस्थ करू लागलेत. याप्रश्‍नांची उत्तरे कुणी द्यायची हे म्हटलं तर आज अवघड जागेवरच दुखणं ठरू शकतं.
गेल्या काही दशकांत समाजकारण आणि राजकारण या दोन्ही क्षेत्र त्यांच्या मुळ अधिष्ठानाशी असलेली नाळ हरवून बसलेत का अशी शंका निर्माण करणारी  परिस्थिती समोर दिसते आहे........
हे दोन्ही क्षेञ समाजाशी अगदी घरातल नात सांगतात, किंबहूना समाजाच्या अस्तित्वामुळेच या दोन्ही क्षेञांचे अस्तित्व मुल्य अधोरेखित होते. अगदी प्रेमी युगुलांच्या  भाषेतच सांगायचं झालं तर दो जिस्म एक जान अस हे नात आहे. आत त्याच भाषेतली प्रतारणा, बेवफाई, या गोष्टीही या दोन्ही क्षेत्रात दिसतात. दिसू द्या....  आपला तो विषय नाही,माञ हे असं का घडत यावर मात्र जरूर भाष्य आवश्यक वाटते म्हणूनच हा प्रपंच.....
समाजव्यवस्था अस्तित्वात आली, समाजाच्या दैनंदिन गरजा व्यक्तिगत, सामुहिक अडचणींवर मात करण्यासाठी स्थानिक पातळीवर मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात  समाजकारणाचा खर्‍या अर्थाने जन्म झाला असावा, समाज जसजसा व्यापक होत गेला तसतसे समाजकारण प्रगल्भ होत गेले. समाजहित हेच समाजकारणाच्या  निर्मितीचे एकमेव उद्दिष्ट होते. जेंव्हा समाजकारण प्रगल्भ होण्याची प्रक्रिया सुरू होती तेंव्हाच समान पातळीवर शासन म्हणून आणखी एक व्यवस्था विकसित होत  होती. समाजाचे प्रश्‍न हाताळणे हे समाजकारणाचे काम तर सांघिक पातळीवर राजकोषातून समाजाच्या मुलभूत गरजा पुर्ण करणे, सोयीसुविधा उपलब्ध करून  देणे, अंतरबाह्य शत्रूपासून संरक्षण देणे याची जबाबदारी शासन व्यवस्थेवर होती. या दोन्ही प्रवाहांना आपल्या कार्यक्षेञाची मर्यादा ठाऊक होती किंबहूना ती  चौकटच त्यांनी आखून घेतली होती.दोघेही परस्परांच्या क्षेञात ढवळाढवळ करतांना अपवादात्मक परिस्थितीच  दिसत.
काळाच्या ओघात एकूणच परिस्थिती बदलत गेली.शासनव्यवस्थेच्या उगम स्थानाने राजकारण हे गोंडस नाव धारण केले.पुढे तर राज मिळविण्याचे कुरूक्षेञ म्हणून  ‘राज’का‘रण’असा उपहास प्रत्यक्ष कृतीत आला, व्यक्तीगत लाभ, लोभ, असूया मत्सर अशा व्यांधींनी या क्षेञाला घेरले. यातून निर्माण होणारी उणिव भरून  काढण्यासाठी समाजकारणाला लक्ष्य केले गेले.समाजकारणही राजकारणाच्या कुटनितीला  बळी पडू लागले. दोन्ही क्षेञांनी आखून घेतलेल्या चौकटींच्या भिंती  ठिसूळ झाल्या.मुळ उद्देश अडगळीत पडले.राजकारण सत्तेच्या भोवती पिंगा घालू लागले.शंभर टक्के समाजकारणाच्या हाका राजकारणाच्या रवीने घुसळून  निघालेल्या सत्तेच्या लोण्याकडे आकर्षित होऊ लागल्या.समाजकारणातून राजकारण की राजकारणातून समाजकारण असा संभ्रम या परिस्थितीने निर्माण केला.
आज समाजकारणाची जी वाताहत होतांना दिसते आहे ती याचमुळे. समाजकारणाचे अस्तित्व केवळ नावापुरते उरले आहे.त्याही पेक्षासमाजकारणाचा उदयच मुळी  राजकीय प्रलोभनातून होतो की काय असा प्रश्‍न गल्लोगल्ली भुछञाप्रमाणे उगविणार्‍या समाज संघटनांमुळे उपस्थित होऊ लागला आहे.अलिकडच्या सामाजिक  संघटनांच्या मुखियांचा हा प्रवास लक्षात घेतला तर परिस्थिती स्पष्ट व्हायला वेळ लागणार नाही.सुरूवातीची काही वर्ष समाजाच्या नावावर आपले अस्तित्व ऊभे  करायचे,बुड स्थिर स्थावर होत आहे असे दिसले की कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या आश्रयाला जायचे नाहीतर आपल्याच सामाजिक संघटनेचे राजकिय बारस  उरकून घ्यायच.हे दोन्हीही शक्य झाले नाही तर कुठल्या तरी कथित समविचारी राजकीय पक्षाला सशर्त पाठींबा देऊन उपकृत करायचे.अर्थात पाठींब्याच्या अटींना  अँन्टीचेंबरचा स्टार लागू असल्याने त्या जाहीरनाम्यात येत नाही.ही साथ एव्हढ्या वेगाने अलिकडच्या काळात फोफावली की प्रस्थापित राजकीय नेते किंवा  दस्तूरखुद्द राजकीय पक्षांनाही समांतर सामाजिक संघटना स्थापन करण्याचा मोह टाळता आला नाही.म्हणूनच हा प्रवास नेमका कुठून कसा म्हणजे  समाजकारणातून राजकारण की राजकारणातून समाजकारण हा संभ्रम अनुत्तरीत राहतो.उत्तर मिळो ना मिळो पण समाजकारण राजकारणाची वेठबिगारी  स्वीकारण्यास राजी झाले हे दुःख समाजाने कसे पचवायचे हाच खरा कळीचा मुद्दा आहे.