Breaking News

ग्रामस्थांचे पुरवठा अधिकारी कार्यालयात ठिय्या

बुलडाणा, दि. 30 - मालाची अफरातफर करून उद्धट वागणूक देणार्‍या रेशन दुकानदारावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी संग्रामपूर  तालुक्यातील अकोली खुर्द व राजपूर ग्रामस्थांनी आज पुरवठा अधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला. मागणी मान्य होत नाही तोपर्यंत जागेवरून उठणार नाही,  अशी भूमिका त्यांनी घेतली. दुपारी बारा वाजेपासून ठाण मांडलेले ग्रामस्थ सायंकाळी सातपर्यंतही कार्यालयात बसून होते.
जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अकोली खुर्द व राजपूर येथील रेशन दुकानाचा परवाना मथूराबाई नामदेव तुंबडे यांच्या नावावर  आहे. मात्र त्यांच्याकडून वेळेवर व नियमाप्रमाणे माल दिल्या जात नाही. शासकीय मालाची अफरातफर करून विक्री केली जाते. याबाबत तहसीलदारांकडे  वेळोवेळी तक्रारी देण्यात आल्या आहेत. त्यावर त्यांनी वरिष्ठ कार्यालयास तसा अहवालही पाठविला आहे. परंतु याबाबत अद्यापही कुठलीच कारवाई करण्यात  आली नाही. त्यामुळे सदर दोन्ही गावातील अनेक महिला व पुरुष लाभार्थ्यांनी आज जिल्हा पुरवठा विभागात ठाण मांडले. दुपारी बारा वाजेपासून हे ग्रामस्थ  कार्यालयात बसून आहेत. दरम्यान त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांची भेट घेतली. त्यांनी संबंधित दुकानदारावर कारवाईचे आश्‍वासन दिले.  परंतु सकाळपासून दौर्‍यावर गेलेले पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांची ग्रामस्थांशी भेट झाली नाही. त्यामुळे मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत कार्यालयातून  हलणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. सायंकाळी 7 वाजेपर्यंत ग्रामस्थ कार्यालयात बसलेले होते.
यावेळी सरपंच नीलेश सोळंके, महादेव काजळे, भगवान सोळंके, शालीग्राम शेगोकार, मुरलीधर शेगोकार, विष्णू कराळे, बाजीराव निकम, श्रीराम तुंबडे,  डिगंबर खिरोडकर, नथ्थू काळे, सरुबाई इंगळे, राजकन्या काळे, सत्यभामा भारंबे, प्रमिला वानखडे, संगीता तुंबडे, उषाबाई चराठे, शेबुबाई पवार, द्वारकाबाई  काजळे, मैनाबाई चव्हाण, संध्या सोळंके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.