Breaking News

मुंबई पालिकेच्या निवडणूकांचा बिगुल !

दि. 31, डिसेंबर - महापालिका निवडणूकांचा बिगुल वाजण्यापूर्वीच शिवसेना आणि भाजपामध्ये तुणतुणे वाजायला सुरूवात झाली असून, याचे टोक जसजश्या निवडणूका जवळ येतील तसतसे वातावरण हे गंभीर आणि टीकेचे टोक गाठणारे असेल यात शंका नाही. शिवसेना राज्यात आणि केंद्रात भाजपासोबत सत्तेत सहभागी असली तरी अडीच वर्षांच्या काळात शिवसेनेने एकही टीकेची संधी सोडली नाही. नोटाबंदी असो, शेतकर्‍यांचे प्रश्‍न असो, सेनेने प्रखर विरोध करत विरोध करत सत्तेत असूनही, विरोधी पक्षांची भूमिका बजावण्यास मागेपुढे पाहिले नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे, एकीकडे सत्ता उपभोगायची, आणि आम्ही स्वाभिमानी असल्याचा आव आणत विरोध करायचा ही सेनेची रणनिती. आणि निवडणूकांचे निकाल हाती आल्यांनतर पुन्हा युती करायची ही भाजपा-सेनेची जुनी रणनिती. मात्र आता ही रणनिती बोथट होवू लागली आहे. तर दुसरीकडे भाजपाकडून, पध्दतशीरपणे राजकारण करून आपले वर्चस्व सिध्द करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर खारदार करून, आपल्या राजकारणाची दिशा भाजपाने स्पष्ट केली होती. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई महापालिका निवडणूकांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवस्मारकाचे भूमीपुजन करण्यासाठी भाजपाने जसा हा आपल्याच पक्षाचा कार्यक्रम असल्याचा भास निर्माण करत हा कार्यक्रम हॉयजॅक करण्याचा प्रयत्न केला. तस बघता शिवस्मारकाचे भूमीपुजन झाले असले, तरी अजुनही काम सुरू होण्यास बराच अवधी आहे. मात्र राज्यातील जि.प. आणि महापालिकांच्या निवडणूकीत दुरावलेला मराठा समाज जवळ कसा करता येईल यासाठी भाजपाकडून मराठा कार्ड पुढे करण्यात येत आहे. तर दुसरीकडे ओबीसी साठी स्वतंत्र मंत्रालयाची तरतूद करत, ओबीसी समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न देखील यानिमित्ताने भाजपाने केला आहे. मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँगे्रसने आपल्या 45 उमेदवारांची यादी जाहीर करत आघाडी घेत, स्वतंत्र लढण्याचे संकेत देखील दिले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांप्रमाणेच ही निवडणूक देखील प्रत्येक पक्ष स्वतंत्रच लढेल, असाच एकंदरित कौल आहे. फेबु्रवारी मध्ये होणार्‍या मुंबई महापालिकांच्या  निवडणूकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. कोण सत्ता मिळवितो, हा प्रश्‍न महत्वाचा असला तरी, मुबंईवर आपली सत्ता आणण्यासाठी सर्वच पक्ष आतुर  झाले असले, तरी मुंबईतील मतदान हे स्थानिक प्रश्‍नावर केंद्रिभूत असते. त्यामुळे मुंबईमध्ये फार काही उलटफेर बघण्याची शक्यता कमीच. मात्र उलटफेर  करण्यासाठी सर्वंच पक्षांनी आपली रणनिती अवलंबायला सुरूवात केली आहे. मुंबईचे प्रश्‍न अद्यापही जुनेच आहे. मुंबईकरांचे प्रश्‍न सोडवण्यात अद्यापही यश  आलेले नाही. लोकल रेल्वे सेवांचा उडालेला बोजवारा असेल, त्याला सावरण्यासाठी मेट्रो प्रकल्प आले असले, तरी मुंबईकरांचा लोकल प्रवासाचा प्रश्‍न सुटलेला  नाही. तोच प्रश्‍न पाणी, निवारा याबाबतीत लागु आहे. मुंबईत अनेक प्रकल्प आले, मात्र त्यातून काय साध्य झाले, कुणाचा विकास झाला हा प्रश्‍न अनुत्तरितच  राहतो. त्यामुळे सर्वच पक्षांचा रणनिती मध्ये, आणि भांडणामध्ये मुंबईचा विकास हरवू नये, मुंबईकरांचे प्रश्‍न हरवू नयेत हीच अपेक्षा !