महापुरूषांची इतिहास लेखकांनी उपेक्षाच केली - श्रीपाल सबनिस
। हुतात्मा चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
अहमदनगर, दि. 26 - महाराष्ट्राचा इतिहास लिहीताना जातिचं जाणंवं नसावं, तसा लिहीलेला इतिहास विकृती निर्माण करून समाजात आग लावण्याचं काम करतो. त्यामुळे महाराष्ट्राचा वैचारीक नकाशा जळाला आहे, महाराष्ट्र एकात्म होऊ शकला नाही असे प्रतिपादन 89 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. श्रीपाल सबनिस यांनी केले. जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या श्री शिवाजी सहकारी ग्राहक भांडारातर्फे देण्यात येणा-या हुतात्मा चौथे शिवाजी महाराज राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री माधवराव मुळे हे होते.इतिहास हा विवेकाने सांगावा, ऐकावा व वाचावा. ब्राम्हण व ब्राम्हणेतर वादाने महाराष्ट्राच्या वैचारीक मंथनात दोन्ही बाजूने ब्राम्हणवाद जपला गेला त्यामुळे महाराष्ट्राचे खुप मोठे नुकसान झाले. या वादाचा दुवा साधण्याचं काम महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केले पण त्याचीही इतिहासात उपेक्षा करण्यात आली. हुतात्मा चौथे शिवाजी महाराजांचे महापराक्रमी योगदानही महाराष्ट्रातील इतिहासकारांनी दुर्लक्षित केले हे अतिशय लांछनास्पद असल्याचे ते म्हणाले. वाड्मयीन संस्कृतीला जोपासणारी तसेच सहकार व साहित्य यांचा एकत्रित सहवास होणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने जिल्हा मराठा संस्था चौथ्या शिवाजी महाराजांचे स्मरण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याबद्दल त्यांनी संस्थेचे अभिनंदन केले.
यंदा पुरस्काराचे दुसरे वर्ष असून राज्य साहित्य पुरस्कारांमध्ये संशोधनपर पुस्तक पुरस्कार कोल्हापूर येथील डॉ. शरद गायकवाड यांच्या ‘मातंग समाज: साहित्य आणि संस्कृती’, तर समीक्षापर लेखन पुरस्कार लातूर येथील डॉ. नानासाहेब सूर्यवंशी यांच्या ‘ग्रामीण साहित्य: मूल्य आणि अभिरुची’, तसेच उस्मानाबाद येथील कविवर्य डी. के. शेख यांच्या ‘दंगल आणि इतर कविता’ या काव्यसंग्रहास, आत्मकथनपर पुरस्कार मुंबई येथील भगवान वाहुळे यांच्या ‘उसवलेले टाके’ या पुस्तकारस, तर सध्या सिंगापूरस्थित येथील मोहना कारखानीस यांच्या ‘जाईचा मांडव’ या कथासंग्रहास पुरस्कार देण्यात आले. तसेच सृजनशील व वैचारिक साहित्य प्रकाशित करणार्या सातारा येथील ‘लोकायत प्रकाशन’ चे राकेश साळुंके यांना उत्कृष्ट प्रकाशक राज्य साहित्य पुरस्कार देण्यात आला. तसेच जिल्हास्तरावरील विशेष वैचारीक साहित्य पुरस्कार डॉ. मच्छिंद्र मालुंजकर’ यांच्या ‘लोकवाङ्मयाविष्कार चिकित्सा’ या ग्रंथास देण्यात आला.
पुरस्कार निवड समितीच्या वतीन प्रा. श्रीमती मेधाताई काळे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शिवाजी सहकारी ग्राहक भांडाराचे चेअरमन श्री जी. डी. खानदेशे यांनी केले. यावेळी जिल्हा मराठा संस्थेचे श्री. नंदकुमार झावरे, श्री. रामचंद्र दरे, श्री. अॅड. विश्वासराव आठरे पाटील, अॅड. दिपलक्षीताई म्हसे, सौ अरूणा काळे, सौ जंगले मॅडम, डी. के. मोरे, सहकारी ग्राहक भांडाराचे पदाधिकारी व पुरस्कार निवड समिती सदस्य उपस्थित होते.