Breaking News

एटीएममधून 8 लाखाची चोरी करणारे जेरबंद

नाशिक, दि. 30 - नाशिक-पुणे महामार्गावरील विजय-ममता थियेटर परिसरातील एटीएम फोडून सुमारे आठ लाख रुपयांची चोरी करणार्‍या  टोळीला उपनगर पोलिसांनी शिताफीने पकडून सहा संशयिताना अटक केली आहे. या गुन्ह्यात एकूण सात जणांचा समावेश असून एक जन फरार आहे. हे सर्व  संशयित याच परिसरात राहाणारे असून त्यांच्याकडून एटीएम मशिन फोडण्यासाठीचे साहित्य (ग्राइंडर मशीन कटर आणि इतर साहित्य) जप्त करण्यात आले आहे.  पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत या तपासाची माहिती दिली. या चोरीप्रकरणी मिलिंद नेहे यांनी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार  केली होती.
सप्टेंबर महिन्यात या चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून त्यातील रोख 8 लाख 90 हजार 500 रुपये  चोरले होते. त्याचदिवशी या चोरांनी  परिसरातील युनियन बँकेच्या एटीएमही फोडण्याचा प्रयत्न केला होता. या एकाच परिसरातील दोन एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारे चोरटे याच परिसरातील  असल्याचा संशय सुरुवातीपासूनच पोलिसांना होता. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत, उपनिरिक्षक इंगळे, जाधव, शिंदे, अशोक साळवे, हवालदार मांदळे,  के. टी. गोडसे, बाळानाथ बोडके, किरण देशमुख, भावले, महेंद्र जाधव, सुधीर काकड, देवराम बोरसे आदींनी तपास करत नीलेश ऊर्फ दाद्या अ‍ॅलेक्स किन (25)  आणि राजेश ऊर्फ चिंकू सुरेश खडताळे (24) या पंचशीलनगरमध्ये दोघांना पोलिसांनी आपला खाक्या दाखविताच आपला गुन्हा काबुल केला. या दोघांनी  दिलेल्या माहितीनुसार सहकारी अभिजित उर्फ नाना उत्तम सुपारे (25, रा. निर्मिती ऍव्हेन्यू कॉलनी, विजयममता जवळ), मनोज अनिल विखे (19), दिनेश हरी  यशवंते (26, रा. पंचशील कॉलनी), अजय संजय पवार (23, रा. गोसावीवाडी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चोरट्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस  कोठडी सुनावण्यात आली आहे.