नाशिकमध्ये 1 कोटी 35 लाखाच्या बनावट नोटा जप्त
11 चलन द्रोह्यांमध्ये दोन राजकीय चेहर्यांचा समावेश
नाशिक, दि. 24 - शहर पोलीसांनी गुरूवारच्या मध्यरात्री केलेल्या एका धडक कारवाईत बनावट चलनाचा विनिमय करणार्या अकरा जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे या टोळीत राष्ट्रवादी काँग्रेसचे भुजबळ समर्थक शहर पदाधिकारी छबु नागरे आणि पवार समर्थक रामराव पाटील या दोघांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, आज त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता, सर्व 11 संशयितांना 29 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नाशिक शहर पोलीस आणि आयकर विभाग यांनी संयुक्तपणे ही कारवाई केल्याचे वृत्त आहे.या संदर्भात पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंघल यांनी पत्रकारांशी वार्तालाप करतांना सांगीतले की, हजार पाचशे रूपयांच्या जुन्या चलनी नोटा केंद्र सरकारने चलनातून बाद केल्यानंतर या नोटांच्या विनिमयांवर नजर ठेवून दोषींवर सक्त कारवाईचे आदेश प्राप्त झाल्यानंतर शहर पोलीस यंत्रणा आपले कर्तव्य बजावित असतांना शहर हद्दीत अशा प्रकारचे गुन्हे दाखल होत आहेत. त्यातच गुप्त खबर्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार 10 ते 12 जणांची टोळी नाशिकमध्ये अशा प्रकारचा व्यवहार करण्यासाठी धुळ्याकडून नाशिककडे येणार आहे.या माहितीवरून 23 डिसेंबरच्या मध्यरात्री मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल जत्राजवळ पोलीसांनी नाकाबंदी केली आणि मध्यरात्री 1 वाजता स्कोडा एम.एच.15, सी.एम. 7002, फोर्ड फिगो एम.एच. 04 इएफ 9701, सियाझ एमएच 15 एफएच 2111 या गाड्यांना थांबवून झडती घेतली असता या तीन गाडींतील एकुण 11 इसमांना आपल्या ताब्यात घेतले. सदर गाड्यांची झडती घेतल्यावर नकली जुन्या चलनाच्या 500 रूपये व 1000 रूपये दराच्या एकुण 1 कोटी 35 लाख रूपये जप्त करण्यात आले. तसेच 20 लाख रूपये किंमतीच्या नमुद तीन गाड्या व रोख रक्कम 1 लाख 80 हजार 40 रूपये जप्त करण्यात आले. सदर कामी आयकर निर्देशनालय अन्वेषण युनिट-1 पुणे यांचीही मदत घेण्यात आली आहे.
सदर मुद्देमालाविषयी संशयितांना विचारपुस केली असता त्यांचेकडुन जप्त केलेल्या 500 रूपये व 100 रूपये दराच्या नकली नोटा गरजू इसमांना देऊन त्यांना कमिशन देण्याचा बहाणा करून त्याचे बदल्यात त्यांचेकडुन नविन नोटा घेणार असल्याबाबतची प्राथमिक माहिती मिळालेली आहे.
संदीप संपतराव रास्ते (45), छबु दगडु नागरे (42), रामराव तुकाराम पाटील (55), रमेश गणपत पांगारकर (63), ईश्वर मोहनभाई परमार (50) राकेश सरोज कारखुर (29), निलेश सतिष लायसे (27), संतोष भिवा गायकवाड (43), गौैतम चंद्रकांत जाधव (28), प्रभाकर केवल घरटे, (44) प्रविण संजयराव मांढरे (31), यांच्याविरूध्द आडगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्र. 215/2016 भादंवि कलम 489 (ब), 489 (क), 489 (ड)489 (इ), 120 ब, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ताब्यात घेतलेल्या 11 इसमांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदर आरोपींतांनी नमुद नकली नोटा कुठे छापल्या तसेच त्यांनी या अगोदर याप्रकारे कुणाला फसवले आहे व त्यांचे साथीदार कोण आहेत याबाबत आडगांव पोलीस हे सखोल तपास करीत आहेत.
पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंघल, पो.उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहा.आपोलीस आयुक्त राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि संजय सानप,पोनि रोहकळ, सपोनि शेगर, सपोनि पाडवी, पोउपनिरीक्षक माळी, उपनिरीक्षक पवार, उपनिरीक्षक चन्ना, हवा, संजीव जाधव, खुळे, शेख, शेळके, गायकवाड, नजीम शेख, पागी, पाटील, गायकवाड, निलके यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
शहरात सापडलेल्या 1 कोटी 35 लाखाच्या या सर्व नोटा नकली बनावटीच्या असून 1 लाख 80 हजाराच्या असली नोटाही जप्त करण्यात आल्या आहेत. हे संशयित नोटा बंडलच्या वर आणि खाली असली नोटा तर मद्ये बनावट नोटा टाकून लोकांना फसवत होते असे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याचे पोलीसांनी सांगीतले. दरम्यान हे बनावट नोटा कुठल्या छापल्या, तसेच या टोळीचे आणखी कुणाशी संबंध आहेत. याविषयी पुढील तापस सुरू आहे. दरम्यान संशयितांमध्ये राजकीय पार्श्वभूमी असलेले चेहरे आढळल्याने शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.