Breaking News

’धोनीला कर्णधारपदावरुन हटवले, तर भारताची ती मोठी चूक ठरेल’

मुंबई, दि. 02 - महेंद्रसिंग धोनीला एक दिवसीय आणि 20-20 सामन्यांच्या कर्णधारपदावरून दूर करण्यात आले, तर भारताची ती मोठी चूक ठरेल, असे मत 2011 सालच्या विश्‍वचषक विजेत्या टीम इंडियाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी व्यक्त केले आहे.
भारताच्या एक दिवसीय संघाचे नेतृत्त्व विराट कोहलीच्या हाती सोपवण्याची वेळ आली आहे का? या प्रश्‍नावर गॅरी कर्स्टन यांनी थेट उत्तर दिले नसले, तरी यावरुन  टीम इंडियासमोर निर्माण होणार्‍या धोक्याची पूर्व कल्पना त्यांनी दिली. ते म्हणाले की, धोनीला एक दिवसीय सामन्यांच्या कर्णधारपदावरून दूर करायचे असेल, तर  त्याचा धोका आधी लक्षात घेऊनच निर्णय घ्या. पण माझ्या अनुभवाने सांगतो की, महान कर्णधार हे त्यांच्या कारकीर्दीच्या अखेरपर्यंत महान कामगिरी करत  असतात.
कर्स्टन यांनी इंग्लंडमध्ये 2019 मध्ये होणार्‍या विश्‍व चषकाच्या दृष्टीने धोनीला वगळल्याने निर्माण होणार्‍या संभाव्य धोक्याची सुचनाही यावेळी दिली. ते म्हणाले की,  जर धोनीला बाहेर जाण्यापासून रोखले नाही, तर 2019 मध्ये होणार्‍या विश्‍व चषक दौर्‍यात भारतीय संघ चांगली कामगिरी करु शकेलच, याची शाश्‍वती देता येत  नाही. धोनी एक महान खेळाडू असल्याचे कर्स्टन यांनी सांगून, जे त्याच्या क्षमतांवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत आहेत, ते मोठी चूक करत असल्याचेही ते म्हणाले.
त्याच्या कामगिरीवर ते म्हणाले की, त्याचा एक दिवसीय सामन्यातील विक्रम पाहिला पाहिजे. कारण, तो गेम फिनिशरच्या रुपात तो ज्या स्थानी खेळायला येतो,  ते पाहता त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्यासाठी कोणी त्याच्या खेळावर प्रश्‍न उपस्थित करत असतील, तर ते चूक करत आहेत. असे मत त्यांनी यावेळी  मांडले आहे.