Breaking News

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी गंभीरला संधी मिळणार?

मुंबई, दि. 02 - इंग्लडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची निवड आज मुंबईत करण्यात येईल. इंग्लंड संघाच्या भारत दौर्‍याला 9 नोव्हेंबरपासून राजकोटमधील कसोटी सामन्याने सुरुवात होईल. या दौर्‍यात इंग्लंड संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा चिकनगुनियातून सावरला असून, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी ईशांतचे भारतीय संघातील पुनरागमन निश्‍चित  मानले जात आहे. ईशांतला चिकनगुनियामुळे तब्बल दोन महिने सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. त्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी आणि वन डे सामन्यांच्या  मालिकेतही खेळू शकला नाही.
दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी गंभीरला पुन्हा संधी मिळणार का, हा प्रश्‍न सध्या,तरी अनुत्तरित आहे. कानपूरच्या कसोटीत लोकेश राहुलला  झालेल्या दुखापतीमुळे गौतम गंभीर भारताच्या 15 सदस्यीय संघात संधी देण्यात आली होती. मग कोलकाता कसोटीत शिखर धवनच्या बोटांना दुखापत झाली  आणि इंदूर कसोटीसाठी गंभीरला अकराजणांच्या अंतिम संघाचे दार उघडले. पण आता लोकेश राहुल आणि शिखर धवन यांनी आपला मॅच फिटनेस सिद्ध केला  तर गंभीरचेे काय होणार हा प्रश्‍न आहे.