Breaking News

केळी व्यापार्‍यांविरोधात शेतकरी संतप्त

जळगाव, दि. 03 - जिल्ह्यात बोर्ड दरानुसार केळीची खरेदी न करता मोजमापासाठी पट्टी काटा वापरून व्यापार्‍यांकडून केळी उत्पादकांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. त्याविरोधात जळगाव तालुक्यातील केळी उत्पादकांनी आज बाजार समितीच्या बैठकीत तीव्र संताप व्यक्त केला. बोर्डापेक्षा कमी दराने केळी खरेदी करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचा आग्रह यावेळी शेतकर्‍यांनी धरला. 
जिल्ह्यात रावेर तसेच जळगाव येथून दररोज केळीचे बोर्डभाव काढले जातात. त्यास प्रमाण मानून जिल्हाभरात केळी खरेदी व विक्रीचे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार  होतात. मात्र या व्यवहारांवर बाजार समित्यांचे कोणतेही नियंत्रण नसल्याने संबंधित सर्व व्यापारी नेहमीच केळी उत्पादक शेतकर्‍यांची पिळवणूक करताना दिसून  येतात. बाजार समितीचा अधिकृत परवाना नसतानाही केळी खरेदी करणार्‍या बेकायदेशीर व्यापार्‍यांची संख्या त्यात मोठ्या प्रमाणात आहे. त्याबद्दल तक्रार  केल्यावर केळी वेळेवर कापली जात नसल्याने शेतकर्‍यांना मुकाटपणे हा अन्याय सहन करावा लागत आहे.