Breaking News

रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीला पुन्हा ब्रेक

मुंबई, दि. 03 - भारताचा फलंदाज रोहित शर्माच्या कसोटी कारकीर्दीला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. रोहितची दुखापत गंभीर असल्याची माहिती मिळते आहे. त्याला शस्त्रक्रियेलाही सामोरे जावे लागू शकते, अशी माहिती निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी दिली आहे. न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या वन डे  मालिकेदरम्यान रोहितच्या मांडीचे स्नायू दुखावले होते. त्यावर उपचारासाठी आणि काही तपासण्या करून घेण्यासाठी रोहित इंग्लंडला जाणार असून, त्याला सहा  ते आठ आठवडे विश्रांती घ्यावी लागू शकते, असे प्रसाद यांनी म्हटले आहे. दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीसाठी काल भारतीय संघाची घोषणा झाली.
भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने इंग्लडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियात पुनरागमन केले आहे.  भारताचा दिग्गज सलामीवीर गौतम गंभीर तसेच युवा फलंदाज करूण नायर आणि गोलंदाज जयंत यादनेही पंधरा जणांच्या भारतीय संघात आपले स्थान कायम राखले आहे. अष्टपैलू हार्दिक  पंड्याचा भारतीय संघात समावेश झाला आहे. दरम्यान रोहित शर्मा अजूनही दुखापतीतून सावरलेला नसल्यानं त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले आहे.