Breaking News

पिंपरी पालिकेतील मोठमोठ्या भ्रष्टाचारावर भाजप गप्प का ः रमेश वाघेरे

पुणे, दि. 30 - पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये छोट्याछोट्या भ्रष्टाचारावर पिंपरी-चिंचवड शहर भाजपा मोठमोठी आंदोलने करताना दिसत आहेत, मात्र शहरातील घरकूल घोटाळा, बीआरटीएस रस्त्याच्या कामातील ठेकेदाराला दिलेले ज्यादा दर, बंद पाईपलाईन अशा विविध घोटाळ्यांबाबत भाजप गप्प का, असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्या भाजपला केला आहे. 
तसेच आगामी महापालिका निवडणुका तोंडावर असताना भाजपाकडून महापालिकेतील विकास कामांमध्ये झालेल्या छोट्याछोट्या भ्रष्टाचाराबद्दल शहरातील कार्यकर्ते गोळा करून महापालिकेच्या प्रवेशद्वारावर स्टंटबाजी करून प्रसिद्धी मिळवली जात आहे. मात्र पालिकेतील इतर भ्रष्टाचाराबाबत भाजप गप्प का, पिंपरी-चिंचवड शहर भाजपने घरकूल घोटाळा, बीआरटीएस, बंद पाईपलाईन, 24 तास पाणीपुरवठा यामध्ये झालेला भ्रष्टाचार बाहेर काढावा, तसेच शितलबाग पादचारी पुलाच्या चौकशीसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या चौकशीचे काय झाले याचे उत्तरही भाजपने द्यावे, असेही त्यांनी पत्रकात म्हणाले आहे.