Breaking News

चिमुकलीवर केलेल्या अतिप्रसंगानंतर साता-यात तणावाचे वातावरण

सातारा, दि. 02 - अवघ्या सहा 6 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग झाल्याने सातार्यात खळबळ उडाली असून ही घटना उघडकीस आल्यानंतर शाहूपुरी परिसरात संतापाची लाट उसळल्याने तणावाचे वातावरण झाले. या घटनेनंतर पीडित कुटुंबियांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून  संशयित मधुकर महादेव आठवले याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, पोळपाट देण्यासाठी गेल्यानंतर ही घटना घडली असल्याचे समोर आले आहे.
याबाबत पोलिस ठाण्यातून माहिती मिळाली आहे. या घटनेतील तक्रारदार व संशयित आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे असून सातार्यात राहत आहेत. रविवारी दि. 30 रोजी दुपारी या घटनेतील 6 वर्षीय मुलगी मधुकर आठवले याच्या घरी दीपावलीच्या सणानिमित्त घेतलेले पोळपाट देण्यासाठी गेली होती. संशयित आरोपी त्यावेळी घरामध्ये एकटाच होता. पीडित मुलीने घरामध्ये काकू आहेत का, असे विचारून पोळपाट  द्यायचे असल्याचे सांगितले. त्यावर संशयिताने मुलीला घरामध्ये आत बोलवले. मुलीच्या हातातील साहित्य त्याने फेकून दिले व मुलीला उचलून आतील बेडरूममध्ये जबरदस्तीने नेले.  त्यानंतर संशयिताने गैरवर्तन करण्यास सुरुवात केल्याने मुलीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. आठवले याने त्यावेळी मुलीला गप्प बसण्यासाठी धमकी दिली. त्यावेळी आठवले बाथरुममध्ये गेल्यानंतर तीच संधी साधत मुलीने तेथून सुटका करुन घेतली. ती थेट पळत पळत घरामध्ये आली. या घटनेने पीडित मुलगी कमालीची घाबरली होती. दरम्यानच्या काळात पीडित मुलीची आई सहा वाजण्याच्या सुमारास घरात आल्यानंतर मुलीने ओक्साबोक्सी रडत रडतच घडलेली घटना सांगितली. पिडीत मुलीच्या आईने पतीला फोन करुन तत्काळ शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
 दरम्यान, या घटनेची माहिती परिसरात पसरल्यानंतर संतप्त भावना निर्माण झाल्या व तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी सर्वांना शांततेचे आवाहन करुन संशयित मधुकर आठवले याला ताब्यात घेवून अटक केली. संशयिताला जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे.