Breaking News

दारूबंदी समितीच्या कार्याध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी

शेवगाव (प्रतिनिधी) । 03 - दारूबंदी समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष अमोल घोलप यांना एका अज्ञात व्यक्तीने सोमवार (दि. 31 ऑक्टोबर) रोजी मोबाईलवरून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली आहे.याबाबत घोलप यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात पो. नि .सुरेश सपकाळे यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सोमवारी दुपारी मी पैठण रोड येथे असताना एका अनोळखी व्यक्तीने मोबाईलवरून बोलताना तुम्ही दारूबंदीचे आंदोलन बंद करा अन्यथा त्याचे वाईट परिणाम होतील. शिवीगाव करीत जीवे मारण्याची धमकी दिली.धमकी देणार्‍या आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी घोलप यांनी केली आहे. दारूबंदी समितीच्या माध्यमातून घोलप यांनी पुढाकार घेतल्याने महिलांमध्ये जागृती होऊन शेवगाव तालुक्यात चापडगाव येथे दारूची बाटली आडवी झाली. तसेच घोटण व हातगाव येथे दारूबंदी समितीच्या वतीने दारूबंदीसाठी विशेष ग्रामसभा झाल्या आहेत. शेवगाव तालुक्यात तसेच शेवगाव शहरातील काही वॉर्डातही दारूबंदीसाठी जनजागृती करण्यात येत आहे. दारूबंदीच्या आंदोलनात घोलप यांनी पुढाकार घेत शेवगाव तालुक्यात दारूबंदीसाठी पोषक वातावरण तयार केले आहे. माझ्या आंदोलनामुळे अवैध व्यवसाय करणार्‍यांचे नुकसान होत असल्याने ही धमकी देण्यात आली असावी. घोलप यांना यापूर्वीही अशा प्रकारची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणाची पोलिसांनी चौकशी करून आरोपीला अटक करावी. तसेच घोलप पोलिस संरक्षण देण्याची मागणी दारुबंदी समितीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी केली आहे.