Breaking News

कन्नडीगांचा दबाव, एकीकरण समितीच्या 22 कार्यकर्त्यांना अटक

बेळगाव, दि. 04 - महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आणखी 22 कार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्री अटक केली. कन्नड संघटनांच्या दबावाखाली येऊन ही कारवाई केली जात आहे. यापू्र्वी पोलिसांनी एकीकरण समितीच्या सहा कार्यकर्त्यांना अटक करून त्यांच्यावर दोन पोलीस स्थानकात गुन्हे दाखल केले आहेत.
काळ्या दिनाच्या फेरीत ठाकूरच्या वेशात हातात एअर गन धरून, घोड्यावर स्वार झालेल्या रत्नप्रसाद पवार या तरुणाला पोलिसांनी बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करणे असे गुन्हे मार्केट पोलिसात नोंदवण्यात आले आहेत. अन्य पाच कार्यकर्त्यावर लाल पिवळे ध्वज, पताके काढून सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न, असे गुन्हे शहापूर पोलिसांनी नोंदवले आहेत.
या पाच जणांना आणि रत्नप्रसाद पवार यांना न्यायालयात हजर करून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात केली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांच्यावतीने वकील सुधीर चव्हाण, महेश बिर्जे,अमर येळ्ळूरकर,शाम पाटील यांच्यासह अन्य वकिलांनी न्यायालयात बाजू मांडून जामीन अर्ज दाखल केला. शहापूर पोलीस स्थानकात अटक केलेल्या पाच कार्यकर्त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, पण कारागृहातून सुटका करण्याची वेळ टळून गेल्यामुळे त्यांची सुटका उद्या होणार आहे . तर रत्नप्रसाद पवार यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे.