Breaking News

आम्हाला चर्चा नको, निर्णय हवा : नीतेश राणे

नाशिक, दि. 27 - गुन्हेगाराला कोणताही जात-धर्म नाही. मात्र, राज्यात जातीय तेढ निर्माण करून सामाजात दंगली घडविण्याचे कटकारस्थान भाजप सरकार करीत असल्याचा आरोप करीत, कधी नव्हे ती मराठा समाजाला राज्यात असुरक्षितता वाटते आहे. मराठा समाजाच्या मोर्चाबाबत मुख्यमंत्री अद्यापही गंभीर नसून केवळ चर्चेसाठी निमंत्रणे देत आहेत. परंतु, आम्हाला चर्चा नको तर ठोस निर्णय हवा असल्याची ठाम भूमिका काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी मांडली. 
तळेगाव-अंजनेरी येथील चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर नीतेश राणे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये  त्यांनी मराठा क्रांती मोर्चा यासह अनेक विषयांवर आपले मत व्यक्त केले. चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आगीत तेल  ओतल्याची भूमिका निभावली आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर जिल्ह्यात दंगल उसळली आणि त्यानंतर पालकमंत्री मुंबईला पळून गेले. भाजप सरकारनेच ही दंगल  घडवून आणत दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केल्याचा थेट आरोप करीत, यासंदर्भात येत्या अधिवेशनामध्ये पालकमंत्र्यांना जाब विचारला जाणार  आहे. तेथून मात्र ते पळू शकणार नाहीत, असे नीतेश राणे म्हणाले.