Breaking News

दर चौथ्या दिवशी पाणीपुरवठा हाच सध्या शहरापुढे उपाय

औरंगाबाद, दि. 27 -  कंपनीकडे पाणीपुरवठा असताना त्यांनी केलेल्या चुकांचे परिणाम आता दिसत आहेत. पाण्याचे टप्पे व व्हॉल्व्ह वाढवून ठेवल्याने पाण्याचे  वेळापत्रकच तयार नव्हते. आता व्हॉल्व्हनिहाय टप्प्यांचे वेळापत्रक तयार करणार आहोत. नवीन जलवाहिनीचे काम पूर्ण करणे हाच पाणीप्रश्‍नावर दीर्घकालीन उपाय  आहे. तथापि, तोपर्यंत संपूर्ण शहरात तीन दिवसांआड म्हणजे चौथ्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करणार असल्याचे महापालिका आयुक्त ओमप्रकाश  बकोरिया यांनी मंगळवारी (ता. 26) पत्रकारांशी बोलताना सांगितले. 
महापौर दालनात झालेल्या बैठकीनंतर आयुक्त बकोरिया यांनी सांगितले, की शहराची गरज 200 एमएलडीची आहे; मात्र सध्या 155 एमएलडी पाणी मिळते.  पाणीपुरवठ्याचा पदभार कोणाकडेही असला तरी हीच अडचण येऊ शकते. सध्याच्या पंपांची क्षमता वाढविली तर जी पूर्वीची मुख्य जलवाहिनी आहे ती फुटण्याची  शक्यता आहे. यासाठी जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंतच्या दोन हजार मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण करणे हाच उपाय आहे. पूर्वीचे  कनेक्शन असलेल्या जागी युटिलिटी कंपनीने दिलेले नवीन कनेक्शन, त्यांनी टाकलेल्या पाइपलाइन, बेकायदा कनेक्शन सर्वच गोष्टी तपासण्याचे काम हाती  घेण्यात आले आहे. न्यायालयीन प्रकरणात परिस्थिती काहीही असो; परंतु यापुढे पाणीपुरवठा महापालिकेच्याच ताब्यात राहणार असून, शहराच्या पाणीपुरवठ्यावर  कोणताही परिणाम होणार नाही. यासाठी महापालिका सक्षम आहे. नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामात कंपनीचा अडथळा येणार नाही, याची दक्षता घेतली  जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.