Breaking News

विश्रामबाग रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुरु

प सांगली, दि. 28 - वाहनधारकांकडून वारंवार मागणी होत असलेल्या विश्रामबाग रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला असून, या पुलाच्या  बांधकामासाठी या रस्त्यावरील वाहतुकीत अंशतः बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे विश्रामबाग येथून कुपवाड, माधवनगरसह व त्या भागात जाणार्‍या  वाहनधारकांना आता नवीन मार्गाचा उपयोग करावा लागणार आहे. या मार्गावरील वाहतुकीच्या नियोजनात केलेल्या बदलानुसार नवीन रस्त्याचा वापर करण्याचे  आवाहन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी केले आहे. या रेल्वे पुलाच्या कामामुळे सांगली व मिरज येथील कुपवाडकडे जाणारी वाहतूक जिल्हा परिषद अध्यक्ष  बंगला चौकातून शासकीय विश्रामगृहाजवळील उड्डाण पुलावरुन पुष्पांजली शासकीय वसाहतसमोरुन रत्ना हॉटेल चौकातून वळून पुढे कुपवाडकडे जाईल. कुपवाड  व माधवनगर, यशवंतनगरकडून येणारी व विश्रामबाग, सांगली, मिरजकडे जाणारी वाहतूक रत्ना हॉटेल चौक, शासकीय निवासस्थानसमोरुन व शासकीय  विश्रामगृहासमोरील उड्डाण पुलावरुन जिल्हा परिषद अध्यक्ष बंगला चौकातून वळविण्यात येणार आहे. सांगली, मिरजकडून वारणाली वसाहतीकडे जाणारी वाहतूक  जिल्हा परिषद अध्यक्ष बंगला चौक येथून जूना रेल्वे उड्डाण पूल येथून शासकीय निवासस्थानसमोरुन रस्ता हॉटेल चौक मार्गे पूर्वेकडे विवेकानंद उद्यान, चिंतामणी  मंदिराकडून वारणालीकडे वळविली जाणार आहे. वारणाली वसाहतीकडून सांगली, मिरज विश्रामबागकडे जाणारी वाहतूक चिंतामणी मंदिर येथून उत्तरेकडील  विवेकानंद उद्यानजवळून रत्ना हॉटेल चौकातून जुना रेल्वे उड्डाण पूल येथून जि. प. अध्यक्ष बंगला चौकातून वळविण्यात येणार आहे.