Breaking News

अन्य बोजांमुळे वसंतदादा कारखान्याचा लिलाव रद्द

मिरज, दि. 28 -  शेतकर्‍यांची देणी भागवण्यासाठी शासनाने काढलेला सांगलीच्या वसंतदादा साखर कारखान्याच्या जागेचा लिलाव आज कोणी गिर्‍हाईक आले  नसल्याने रद्द झाला. लिलाव होणारी जागा अन्य बँका आणि आर्थिक संस्थांकडे तारण असल्याने ही जागा विकत घेण्यास कोणी गिर्‍हाईक पुढे आले नाही. त्यामुळे  या जागेच्या मालक सदरी आता शासनाचे नाव लावण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार शरद पाटील यांनी दिली. या कारवाईमुळे यापुढे या जागेची पूर्ण मालकी  ही शासनाची असेल ज्यामुळे या जागेवरील आर्थिक तारणबाबत तडजोडीने शासन स्तरावर निर्णय होईल आणि शेतकर्‍यांचे पैसे वसुल करण्यात येतील, असेही  तहसीलदार पाटील यांनी सांगितले.
वसंतदादा साखर कारखान्यास 2004 मध्ये ऊस दिलेल्या शेतकर्‍यांच्या किमान हमी भावाच्या रकमेतील फरक आणि 2014 आणि 2015 या दोन वर्षातील काही  शेतकर्‍यांचे ऊसाचे सगळेच पैसे भागवण्यासाठी शासनाने कारखान्याच्या जागेचा लिलाव करण्याचे आदेश दिले आहेत. या वसुलीसाठी संघटनेसह अनेक  शेतकर्‍यांनी व्यक्तिगत स्वरुपात तक्रारी केल्या. काही शेतकर्‍यांनी लोकायुक्तांपर्यंत दाद मागितली. लोकायुक्तांनीच शासनास कारवाईचे आदेश दिले. शासनाने  कारखान्याच्या जागा विक्रीचा निर्णय घेतला. मिरजेच्या तहसील कार्यालयाकडून कारखान्याच्या मालकीची साडेबारा एकर जागा लिलावाव्दारे विकण्यासाठी प्रक्रिया  राबवण्यात आली. यासाठी कसबे डिग्रज येथील एका शेतकर्‍यांने स्वारस्य दाखविले. पण त्याने जागेची कागदपत्रे पाहताच प्रक्रियेबाबत काही चर्चादेखील  अधिकार्‍यांशी केले नाही.