Breaking News

आणि पुन्हा शिवस्फूर्तीच्या पेटल्या मशाली

रायगड,  दि. 28 -  रायगड किल्ल्यावर 344 मशाल प्रज्वलित करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीच्या शेकडो कार्यकरत्यांनी दिवाळी साजरी केली. यात हिंदू शिवभक्तांसह मुस्लिम शिवभक्त महीला देखील उपस्थिती होती. किल्ले रायगडावर तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक साज-या करणा-या समितीने गेली काही वर्षापासून दिवाळी रायगडावर साजरी करून मग त्या उर्जेने घरोघरी आनंदाने दिवाळी साजरी करण्यास सुरुवात केली.
यंदाच्या 344 शिवराज्याभिषेक दिनानिमीत्त रायगडावर 344शिवभक्तांसह मशाली प्रज्वलित करून शिर्काई मंदिरापासून राजदरबारात पर्यंत शिवप्रतिमेची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. समितीचे अध्यक्ष श्री.सुनील पवार यांनी आपल्या प्रतिक्रियेत हा चैतन्यसोहळा ऊनुभवण्यासाठी दरवर्षी गर्दी वाढत असून काही दिवसांनी या मशालीतही वाढ होऊन हा रायगड मशालींनी उजळून निघेल आणि उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटतील यात शंका नाही.
समितीचे क्रियाशील सहसचिव सनी ताठेले यांनी किल्ले रायगडावर दिवाळी साजरी झाल्यानंतरच आम्ही आमच्या घरात दिवाळी साजरी करतो. यामुळे दिवाळीचा आनंदात एक वेगळी उर्जा येते असे मत व्यक्त केले.
या सोहळ्यात कोणताही जातीभेद, धर्मभेद पाळला जात नाही हा एक आदर्शच आहे. या आणि तिथीप्रमाणे दरवर्षी साजरा होणार्‍या शिवराज्याभिषेकाला आवर्जून हजेरी लावणार्या श्रीमती हमीद खान व महम्मद अली यांनी आम्ही मुस्लीम असलो तरी आम्हाला छत्रपती शिवाजी राजांबद्दल खूप आदर आहे. सर्व धर्मियांचे सर्व सण सर्वांनीच साजरे केले तर धर्माधर्माच्या मधले अंतर कमी होईल असा आशावाद व्यक्त करत ही आपली मूळ भारतीय संस्कृती आहे असे अभिमानाने श्रीमती खान यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषात व तळपत्या मशालींच्या प्रकाशात काल रात्री रायगड न्हाऊन गेला होता. दिवाळीचा तेजोमय प्रकाश देखील महाराजांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राला आल्हाद देईल यात आता शंका नाही.
या शिवचैतन्य सोहळ्याकरता सनी ताठेले,  समीर वारेकर, आणि राजू मांढरे ह्याने मेहनत घेतली. तसेच आम्ही मावळे ह्या ढोल पथकाने संपूर्ण रायगड दुमदुमला आणि सकाळी किल्ल्यावरील धनगर वस्तीत दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यक्रमात ऐरोली, नवी मुंबई येथून आलेल्या ममता भोसले ह्यांनी कविराज भूषण ह्यांचा ’शिवभूषण काव्यवाचन’ हा कार्यक्रम सादर केला. छायाचित्रकार सिद्धेश गुरव हे ही या सोहळ्याला उपस्थित होते. सलहान मुलां पासून वयोवृद्धां प्रयन्त सर्वांनी नवचैतन्य निर्माण करत कार्यक्रमाची शोभा वाढवली, 85 वर्षाच्या मालती देसाई आणि 92 वर्षाचे गुलाबराव भोसले ह्यांची उपस्थिति होती.