Breaking News

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात गरजेनुसार बदल आवश्यक : आ. गोरे

सातारा, दि. 01 (प्रतिनिधी) : अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात फारच कमी लोकांना शिक्षा होत असून त्याचा गैरवापर होत आहे. मागासवर्गीयांना हाताशी धरून राज्यातील बहुतांश नेत्यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केला आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याची आवश्यक असून या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे आ. जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 
आ. गोरे म्हणाले, राज्यात निघणार्‍या मराठा क्रांती मोर्चामध्ये अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर रोखावा, यासाठी कायद्यात बदल करण्याची मागणी केली आहे ती रास्त आहे. त्याला आपला पाठिंबा आहे. ग्रामीण भागामध्ये इतर समाजातील नागरिकांना त्रास देण्यासाठी व ब्लॅकमेल करण्यासाठी या कायद्याचा वापर करणारा एक वर्ग आहे. याबाबतचा गुन्हा दाखल करण्यासाठी काहीवेळा दबाव आणला जातो. त्यामध्ये राज्यातील बहुतांश नेत्यांचा समावेश आहे. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी कायद्याचा गैरवापर केला आहे. राज्य व जिल्ह्यात अ‍ॅट्रॉसिटीचे अनेक खटले दाखल आहेत. मात्र, त्यामध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याने याचा गैरवापर होतो हे उघड आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यामधील मागासवर्गीय बांधवांच्या सुरक्षिततेचे अधिकार अबाधित ठेवून ज्या जाचक अटींमुळे याचा गैरवापर होत आहे. त्या अटी काढून टाकल्या पाहिजेत. कोपर्डी येथील घटनेतील आरोपींवर लवकर खटला चालवून त्यांना लवकर फाशी दिल्यास भविष्यातील अत्याचाराच्या घटना कमी होणार असल्याचे सांगून ते म्हणाले, शिक्षण व नोकरीत आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजातील युवक पिचला आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी इतर जातीतील मुलांना ज्या सवलती दिल्या जातात. त्या मराठा जातीतील मुलांना मिळाव्यात. तसेच सर्वांसाठी उच्च शिक्षण मोफत करावे. तामिळनाडूमध्ये 68 टक्के आरक्षण दिले जाते. त्याप्रमाणे घटनेमध्ये दुरूस्ती करून आरक्षण देता येऊ शकते. याबाबत सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे. ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी कोठेही मागणी नाही. हे मोर्चे कोणाच्याही विरोधात नसल्याने प्रतिमोर्चा काढण्याचा प्रश्‍नच नाही. नाशिकला असा मोर्चा काढण्याची तयारी सुरू झाल्याचे ऐकले आहे. त्यांनी हा मोर्चा काढू नये, असे आवाहन आ. गोरे यांनी पत्रकार परिषदेत केले. पत्रकार परिषदेस अशोक गोडसे, रामभाऊ पाटील, अतुल जाधव, विवेक देशमुख, काकासो मोरे, भरत जाधव, राजकुमार पोळ, अर्जुन गोडसे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.