परभणीत गुटखा विक्री जोमात..प्रशासन गेले कोमात
परभणी / प्रतिनिधी, दि. 01 - शासनाचे राज्यात गुटखा विक्री बंदचे आदेश असतांनाही जिल्ह्यातील तमाम पोलिस स्टेशनच्या हद्दीत राजरोसपणे गुटखा विक्री सुरू असुन गुटखा माफियांचे नावे व ठिकाणे माहित असतांनाही पोलिस व संबंधित विभाग या गुटखा व्यापार्यांना पाठीशी घालण्याचे काम करत आहेत.जिल्हयातील अनेक सामाजिक संधटनांनी या बाबत निवेदने देवुन कसल्याही प्रकारची कारवाई प्रशासनाने केली नाही याचेच खरे नवल आहे. शहरातील अनेक भागात अगदी गल्ली बोळात खुलेआम गुटख्याची विक्री होत असतांना प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत असुन लाखों रूपयाच्या लाचखोरीमुळे या धंद्याला राजाश्रय मिळाला असल्याचे दिसुन येत आहे. मागील चार महिण्यापुर्वी धार रोडवर असणार्या सय्यद चाँद सय्यद गफुर या गुटखा तस्कराला 9 लाख 60 हजाराच्या मुद्येमालासह अटक करण्यात आले होते परंतु प्रशासनातील लाचखाऊ अधिकार्यांच्या वरदहस्तामुळे हा तस्कर कायद्याच्या सांदीतुन सटकला व नानलपेठ पोलिसांच्या कृपाअर्शिवादाने परत एकदा नव्या जोमाने गुटख्याची विक्री करायला लागला. या प्रकरणी नानलपेठ भागातील व्यापार्यांनी एका निवेदनाद्वारे प्रशासनाला खुले आव्हान दिले असुन आगामी सात दिवसात या गुटखा तस्करावर कार्यवाही न झाल्यास भिक मांगो आंदोलन करण्याची तयारी या व्यापार्यानी केली आहे. समाजातील सर्व सामान्य नागरिक अशा माफिंया विरोधात तक्रार करण्यास धाजवत नाहित आणि जो कोणी समोर आला तर त्याला दंडुकेशाहीचा वापर करून त्याचे तोंड दाबण्याचे अनेक प्रकार या गुटखा तस्करांनी पोलिस कर्मचार्यांना हाताशी धरून या पुर्वीही केले आहेत. शहरासह जिल्ह्यातील तरूणपिढी मोठ्या प्रमाणावर व्यसनाधिन झाली असुन अव्वाच्या सव्वा किंमत मोजुन युवक व गुटख्याच्या व्यसनी गेलेले नागरिक गल्ली बोळातुन गुटखा घेवुन खातांना दिसत आहेत.सुरूवातीच्या काळात एक रूपयाला मिळणारी गुटखा पुडी आज सहा रूपयाला झाली असुन महिण्याकाठी करोडों रूपयांची कमाई हे दलाल व त्यांना मुक्तपणे धंदा करू देणारे संबंधित प्रशासनातील कर्मचारी व अधिकारी करत आहेत.धार रोड वरील 9 लाख 60 हजाराचा गुटखा पकडुन देण्यासाठी याच भागातील काही समाजसेवक पोलिस प्रशासनाकडे गेले असता त्यांच्यावर खोटे आरोप लावत गुन्हे दाखल करू अशी धमकी पोलिस अधिकार्यांनी केली होती.येथिल पोलिस प्रशासन या गुटखा माफियांचे दलाल झाल्यामुळे या तक्रारदारांनी थेट औरंगाबादला जावुन पथक आपल्या सेाबत आणले होते व या पथकाने सय्यद चाँद याचा गुटखा जप्त केला होता. जिल्ह्यातील पोलिस व संबंधित विभागाचे अधिकारी हे या गोरख धंद्यात सामील असुन राजरोसपणे मिळणारा गुटखा प्रशासनातील एकाही अधिकार्याला दिसुन येत नाही व कोणत्याही एजंटाला अटक होत नाही याचाच अर्थ पोलिस प्रशासनातील काही बडे मासे या धंद्याला खतपाणी घालण्याचे काम करत असुन लाचेच्या माध्यमातुन पोलिस कर्मचारी आपल्या वरच्या अधिकार्याला लाखोंची खैरात त्यांच्या तोंडात कोंबुन सोयीस्कररित्या हा धंदा जिल्ह्यात चालवत आहेत. या प्रकरणी गुटखा दलाल सय्यद चाँद सय्यद गफुर व जिल्ह्यातील इतर गुटखा दलालांवर कारवाई करावी अन्यथा आगामी काळात मोठ्या प्रमाणावर प्रशासनाच्या विरोधात भिक मांगो आंदोलन छेडण्याचा इशारा जमाते ए उल्लेमा हिंद संघटनेच्या वतिने पोलिस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आला आहे.
