Breaking News

म्हणे गोध्रा कांड आणि मालेगांवचा बाँबस्फोट झालेच नाही!

दि. 05, जानेवारी - समाजात एखादी गुन्हेगारी या संज्ञेत मोडणारी घटना घडते,संशयितांवर भादंवि च्या घटनेशी संबंधीत कलमाप्रमाणे गुन्हा दाखल होतो.साक्षी पुरावे गोळा करून तपास पुर्ण होतो.आरोपपञ दाखल होऊन न्यायालयीन प्रक्रीया सुरू होते. आणि कालांतराने निकाल येतो....निर्दोष! या प्रक्रीयेत नेमका दोष कुठल्या पातळीवर शोधायचा? की ती घटना घडलीच नव्हती,होता तो एक आभास....!    
अलिकडच्या काही दिवसात माध्यमांच्या वृत्तांवर नजर टाकली तर काही विशेष वृत्त नजर वेधून घेतात.त्यातही गुन्हेगारी विश्‍वातील घटनांमध्ये संशयित म्हणून ज्यांच्या विरूध्द गुन्हा नोंंदविला गेला,संशयितच गुन्हेगार अशा पध्दतीने तपास करून नोंदवलेले साक्षी जबाब,गोळा केलेले पुरावे या आधारे न्यायालयात आरोपपञ दाखल करून सुनावणी सुरू होते.आणि अचानक एक दिवस बातमी झळकते....सबळ पुराव्या अभावी या खटल्यातून अमुक तमुक ची निर्दोष मुक्तता!              अशा घटना बातमी बनून समाजासमोर येतात तेंव्हा समाजमनाच्या संवेदनशील सहनशक्तीवर आघात होतो.गुन्हा घडलेला आहे.त्याचे व्यक्तीगत ,सामुहीक परिणामही समोर असतात.प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनीही या गंभीर घटनेची सत्यता कथन केलेली असते.मग या संशयीतांविरूध्द सबळ पुरावे उपलब्ध झाले नाहीत म्हणून निर्दोष सोडण्याची वेळ न्यायव्यवस्थेवर का यावी असा प्रश्‍न व्यवस्थेला विचारण्या इतपत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.निकाल सन्माननीय न्यायालयाने दिला म्हणून न्यायालयाला जबाबदार धरता येणार नाही,सुनावणी दरम्यान तपासी यंञणांनी सन्माननीय न्यायालयासमोर सादर केलेले साक्षी पुरावे तपासल्यानंतर न्यायव्यवस्था आपला निर्णय  देत असते.न्यायालयाच्या बाबतीत समाजात एक समज आहे.त्या समजातूनच न्याय देवता अंध असते.
दुर्दैवाने हा समज दृढ व्हावा असेच डोळ्यावर पट्टी बांधलेले बोध चिन्ह प्रचलित आहे.खरे तर या सर्व प्रक्रीयेत न्यायालयाची भुमिका तटस्थ असते.आणि मग शेवटी दोष तपास यंञणेसह उर्वरीत व्यवस्थेच्या माथी येते.कसे? ते पाहू या उद्या.....ज्यांनी जग उजळायचे ते चंद्र सुर्यच अंधाराला फितूर झाले तर....(क्रमशः)