Breaking News

कारवाईच्या धसक्याने पाटण तालुक्यातून बोगस डॉक्टरांच्या स्वच्छता मोहिमेस यश

दुर्गम भागात आरोग्य सेवा कोण पुरविणार? 

सातारा, दि. 28 (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांनी आदेश दिल्यानंतर पाटण तालुक्याच्या दुर्गम  व अतिदुर्गम विभागात कार्यरत असलेल्या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राने आक्रमक पवित्रा घेतल्याने बोगस डॉक्टरांनी धसका  घेतला आहे. दरम्यान, कारवाईच्या धसक्याने बोगस डॉक्टरांनी दवाखाने बंद करून पळ काढला. प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सुरू झालेल्या कारवाईचे सामान्य  रूग्णांकडून समाधान व्यक्त होत आहे. मात्र, ग्रामीण भागातील लोकांना आरोग्यसेवा कोण देणार हा प्रश्‍न गंभीर रुप धारण करण्याची शक्यता आहे. शासनाने  बोगस डॉक्टरांना पळवून लावले पण दुर्गम भागातील लोकांना आरोग्य सेवा देण्यासाठी अधिकृत डॉक्टर पाठवा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त करू  लागले आहेत. 
पाटण तालुक्यातील मोरणा विभागात तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. त्या ठिकाणी रूग्णांवर उपचार केले जातात. या विभागात बोगस डॉक्टरांची संख्या मोठी  असल्याचे पाहणीत समोर आले आहे. मोरगिरी, मरळी, सोनवडे या ठिकाणी ठराविक अंतरावर आरोग्य केंद्रे आहेत. मात्र, मोरगिरी प्राथमिक आरोग्य केंद्र वगळता  मरळी आणि सोनवडे या प्राथमिक आरोग्य केंद्राने याबाबत दुर्लक्ष केले आहे. मोरगिरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी  जोरदार छापासत्र सुरू केल्यामुळे सामान्य रूग्णांकडून समाधान व्यक्त होवू लागले आहे. मोरणा विभागातील अनेक गावे डोंगरपठारावर आहेत. तसेच काही गावे  दुर्गम ठिकाणी वसली आहेत. त्या ठिकाणच्या रूग्णांवर वेळेत उपचार करणे अवघड आहे. याचा फायदा उठवत कोणत्याही प्रकारची पदवी नसणार्‍या बोगस  डॉक्टरांनी वैद्यकिय व्यवसाय परिसरात सुरू केले आहेत. परतू डॉक्टरच्या चुकीच्या औषधोपचारामुळे रूग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे  रूग्णांच्या जिवाताशी खेळणार्‍या बोगस डॉक्टरवर कारवाई करावी, अशी मागणी होत होती.
यापूर्वी मोरगिरी केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी बोगस डॉक्टरवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता. परंतू राजकीय दबावामुळे त्यास अडचणी येत होत्या. या  डॉक्टरांकडे शिक्षण, व्यवसायाच्या नोंदणी, अनुभवाबाबत विचारले असता ते डॉक्टर ग्रामपंचायतीच्या सरपंचांची पत्रे वैद्यकीय पथकाला दाखवतात. पाटण  तालुक्याच्या दुर्गम आणि अतिदुर्गम डोंगरी विभागात अनेक बोगस डॉक्टरांचे दवाखाने थाटले आहेत. या दवाखान्यात ग्रामीण भागातील नागरिकावर उपचार केले  जातात. जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांनी बैठक घेऊन आरोग्य विभागाला जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे  जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांना बोगस डॉक्टर शोधण्याचे आदेश दिले होते. बोगस डॉक्टर शोधण्यास टाळाटाळ  करणार्‍या आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यावर कारवाई करण्याचे संकेत जिल्हाधिकार्‍यांनी दिल्यामुळे आरोग्य विभागाचे अधिकारी झाडून कामाला लागले आहेत.  त्यामुळे दुर्गम भागातील बोगस डॉक्टरांनी दवाखाने बंद करून त्या भागातून पळ काढला आहे.