Breaking News

दारु विक्री बंद न झाल्यास आंदोलनाचा इशारा

। क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पांचगे यांचा इशारा 

पुणे, दि. 28 - शिक्रापूर (ता. शिरूर) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावांनी दारूबंदीचे ठराव मंजूर केले. त्यानंतर 100 टक्के दारूबंदी करत असल्याचे  पोलिसांनी जाहीर केले. मात्र, तरीही अनेक हॉटेल आणि ढाब्यांवर सर्रास अवैध दारूविक्री सुरु आहे. शिक्रापूर हद्दीतील अवैध दारूविक्री त्वरित बंद न झाल्यास  पोलिस ठाण्यासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी दिला आहे.
या संदर्भात पाचंगे यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात निवेदन दिले.  पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी सर्व पोलिस ठाण्यांना दारू विक्री बंद करून कारवाई  करण्याचे आदेश दिले होते. तसेच शिरुर तालुक्यातील अनेक गावांनी दारुबंदीचे ठराव केले होते. मात्र, हे ठराव आणि पोलिस अधिकक्षकांच्या आदेशाला केराची  टोपली दाखवत शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व गावांतील हॉटेल व ढाब्यांवर सर्रासपणे अवैध दारुविक्री सुरु आहे. त्यामुळे संबंधीत दारूविक्री बंद करून  दारू विक्रेते, जागामालक, संबंधित बीट हवालदार, अधिकार्यावर कारवाई करण्याची मागणी क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी केली आहे.