Breaking News

चिखली येथील व्यवसायीकांच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस

बुलडाणा (प्रतिनिधी), दि. 28 - सन 2010 2012 मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक पोट निवडणुकीसाठी लागणारे साहित्य तत्कालीन तहसीलदार  यांच्या निर्देशानुसार पुरविण्यात आले होते. परंतु निवडणूक होऊन चार वर्षांचा कालावधी उलटून गेला असताना देखील अद्याप साहित्य पुरविणार्‍या असंख्य  व्यावसायिकांना देयकाची रक्कम देण्यात आली नाही. थकीत रकमेबाबत विचारणा केली असता, अनुदान नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे देयकाची रक्कम  तत्काळ देण्यात यावी, या मागणीसाठी चिखली येथील पाच व्यावसायिकांनी आज 25 ऑक्टोबरपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले  आहे. 
सन 2010 मध्ये चिखली तालुक्यातील 61 ग्रामपंचायतीच्या तर सन 2012 मध्ये 28 सार्वत्रिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या. या  निवडणुकीसाठी तत्कालीन तहसीलदार लोखंडे यांच्या निर्देशावरून साहित्य पुरविण्यात आले होते. विशेष म्हणजे, या निवडणुकीवरील प्रलंबित खर्च  भागविण्यासाठी तहसील प्रशासनाला 19 हजार 92 हजार रुपयाचा निधी प्राप्त झाला होता. परंतु या निधीतून व्यावसायिकांच्या देयकाची रक्कम त्यांनी अदा केली  नाही. या बाबत 29 मार्च रोजी तत्कालीन तहसीलदार विजय लोखंडे यांच्याशी देयकाबाबत चर्चा केली असता देयकाची तपासणी करीत असल्याचे सांगितले. त्याच  दिवशी निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेतली असता त्यांनी संबंधिताची देयके अदा करावी, असे निर्देश दिले होते. परंतु तरी सुध्दा तत्कालीन तहसीलदाराने  देयकाची रक्कम अदा केली नाही. दिवाळीचा सण तोंडावर येवून ठेपला आहे. त्यामुळे 28 व्यावसायिकांचे हजारो रुपये प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे  दिवाळीपूर्वीच देयकाची रक्कम देण्यात यावी, या मागणीसाठी चिखली येथील हशमतखान मनवरखान, गणेश सोनुने, कस्तुरे, अ. समद बागवान सुनील हिवाळे या  व्यावसायिकांनी उपोषण सुरू केले आहे.