Breaking News

सर्वोदयच्या निवडणूकीतून जयंतरावांचा पळ ः पृथ्वीराज पवार

सांगली, दि. 28 -  सर्वोदय साखर कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांचा कल कोणाच्या बाजूने आहे याचा अंदाज आल्यानेच, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील  उलटसुलट व्यक्तव्ये करीत आहेत. ते निवडणुकीला घाबरले असून त्यांनी पळ काढल्याची टीका कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी पत्रकार बैठकीत  केली.
सर्वोदयची निवडणूक ही साखर कारखान्याची नव्हे, संस्थेची आहे. कारखान्याचा ताबा आमच्याकडे असून, सध्या लागलेल्या निवडणुकीशी कारखान्याचा संबंध  नसल्याचे व्यक्तव्य जयंत पाटील यांनी केले होते. त्यावर अध्यक्ष पवार यांनी पलटवार करीत, जयंत पाटील यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, सर्वोदय  कारखान्याच्या मालकी हक्काबाबत साखर आयुक्तांनी सभासदांच्या बाजूने निकाल दिला आहे. सभासदही न्यायाच्या व सर्वोदयच्या बाजूने राहतील, याची आम्हांला  खात्री आहे. सभासदांचा कौल काय असेल, याचा अंदाज जयंत पाटील यांना आला आहे. त्यामुळे ते निवडणुकीबाबत उलटसुलट वक्तव्ये करुन सभासदांची  दिशाभूल करीत आहेत. निवडणूकीला सामोरे जाण्यास ते घाबरले आहेत, असा टोलाही त्यांनी लगाविला.
सर्वोदय कारखान्याने राजारामबापू कारखान्याशी करार केला. करार संपताच आम्ही पैसे देण्याची तयारी दर्शविली. पण त्यांनी पैसे घेतले नाहींत. त्याबाबत  न्यायालय व साखर लवादासमोर सुनावणी झाली. लवादाने संपूर्ण कराराची तपासणी केली. त्यानंतर सभासदांची मालकी मान्य करीत, पैसे स्विकारण्याबाबत  राजारामबापू कारखान्याला स्पष्ट आदेश दिले आहेत. त्याविरोधात त्यांनी जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले आहे. येत्या 3 नोव्हेंबरला त्यावर अंतिम युक्तिवाद  सुरु होईल. लवकरच त्याचा निकाल लागून कारखाना सभासदांच्या मालकीचा राहील, असा विश्‍वासही पवार यांनी यावेळी व्यक्त केला.