Breaking News

माणसाला धर्मांध बनविण्यासाठी प्रतिगामी शक्तींचे षडयंत्र !

दि. 14, ऑक्टोबर - भारतीय माणूस धार्मिक आहे मात्र तो धर्मांध नाही. ही बाब अनेकवेळा स्पष्ट झाली आहे. मात्र राजकारणात आणि पारंपारिक धार्मिक सत्ता आपल्या हातात एकवटण्याच्या मनसूब्यामुळे धार्मिक माणसाला धर्मांध बनविण्याची प्रक्रिया राबवली जात असली तरी त्याला यश मिळत नाही हिच खरी भारताची शक्ती आहे.‘मजहब नही सिखाता, आपस में बैर रखना’ या काव्याच्या ओळी प्रत्येक भारतीयांच्या ओठावर आहेत. सामान्य माणूस या ओळींवर अधिक प्रेम करतो. कारण त्याला स्वत:चा धर्म इतरांशी वैर निर्माण करण्याची शिकवण देत नाही. जगातील कोणत्याही धर्माचा पाया हा शांततापूर्ण सहअस्तित्व यावरच आधारलेला आहे. धर्म हा कोणत्याही प्रकारे हिंसाचाराची शिकवण देत नाही. मात्र धर्माचा आधार घेवून ज्यांना लोकांचे शोषण करायचे आहे किंवा लोकांवर हुकूमत गाजवायची आहे, असे स्वार्थांध हेच धर्मांध होवू शकतात. या आंधळया धर्मांध प्रवृत्तीमुळे देशभर धार्मिक मुद्दयावरून रणकंदन सुरू आहे. काही धर्मांध गुन्हेगारीला, विकृतीला दोष देण्याऐवजी एका विशिष्ट समाजाला टॉर्गेट करण्याचे प्रयत्न सुरू आहे. नाशिक जिल्हयातील त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात तळेगाव अंजनेरी येथे घडलेल्या या घटनेचे संतप्त पडसाद उमटत असतांना दोन समुदायांमध्ये वाद लावण्याचे, मने कलूषित करण्याचे प्रकार घडत आहे. तर दुसरी घटन पुणे जिह्यातील लोहगावमध्ये झालेली दंगल. किशोरवयीन मुलांमधील वादाचे पर्यवसान होऊन लोहगाव येथे मराठा व गारूडी या  दोन समाजातील गटात तुंबळ हाणामारी, दगडफेक व दंगलीत रुपांतरीत झाला. मराठा असो वा दलित दोन्ही समुदाय हा फुले शाहू आंबेडकरी विचारांची कास धरलेला समुदाय. मात्र काही महिन्यापासून दोन्ही समुदायात तेढ कशी निर्माण करता येईल यासाठी तथाकथित धर्मांध शक्तीकडून खतपाणी घातले जात आहे. आणि त्याला हा समुदाय कुठैतरी, काहीप्रमाणात बळी पडत चालला आहे. धर्म ही माणसाच्या वैयक्तीक जीवनात उत्तम गुणांचे आचरण करण्याची बाब आहे. ज्यांचे आचरण शुध्द असेल त्यांना इतरांपासून धोका असण्याचे कारणच नाही. पण जेव्हा ते स्वत:ला धोक्यात पाहतात तेव्हा त्यांच्या आचरणात निश्‍चितपणे अशुध्दता किंवा कपटनिती आहे असे समजले पाहिजे. परंतु ब्राह्मणी व्यवस्थेने त्यांना स्वत:च्या हितासाठी वापरतांना इतरांना म्हणजे हिंदू धर्मातील बहुजन जाती समुदायांना धर्मांध बनविण्याची मोहीमच राबविली. या मोहीमेला राबवतांना तिच्या विरोधातही प्रतिक्रीया उमटल्या आणि भारत धर्मांधांच्या हातातील बाहुले बनते की काय अशी परिस्थिती निर्माण होवू लागली. भारताला खरा धोका धर्मांधांमुळेच आहे. आज जगात सर्वत्र शांततापूर्ण सहअस्तित्वाचे प्रयत्न चालू असतांना धर्मा-धर्मांतील कडवेपण उभे करण्याचा धर्मांध राजकीय शक्ती प्रयत्न करतात. मात्र भारतीयांनी अशा धर्मांध शक्तींना फारसा आधार दिलेला नाही. मात्र सामाजिक धुव्रीकरणात या शक्ती प्रबळ होतांना दिसून येत आहे. त्यामुळे विविध जातीत वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून या प्रकरणांला विशिष्ट रंग देवून या जातीसमुदांयाना परस्परांत कसे लढवता येईल यासाठी धर्मांध शक्ती सरसावल्या आहेत. वैचारिक पातळी उंचावलेल्या पुरोगाम्यांना या अशा घटनांमुळे पुन्हा एकदा प्रतिगामी करण्यासाठी धर्मांध शक्तींनी आपली रणनिती आखली आहे. आणि त्यात काहीजण अलगद सापडत चालले आहे. हे चित्र महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी आता जागरूक होवून या धर्मांध शक्तींला रोखण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.