Breaking News

बटाट्याचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल

औंध, दि. 25 (प्रतिनिधी) - अनुकूल हवामानामुळे गतवर्षीपेक्षा यंदा बटाट्याचे पीक जोमात आले. बटाटा परिपक्व झाल्यानंतर तो मार्केटला पोहोचण्यापूर्वी  बटाट्याचे दर पडल्याने उत्पन्न व भांडवलाचा मेळ बसत नाही. दिवाळीच्या तोंडावर बटाटा विक्रीतून या उत्पन्नासाठी भांडवलापोटी काही बँकांचे घेतलेले पैसे देवून  पुढील पिकाचे नियोजन करण्याचे शेतकर्‍यांनी ठरविले होते. परंतू दराअभावी हे शेतकर्‍यांचे नियोजन कोलमडल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
खटाव तालुक्यात बटाटा हे नगदी पीक घेण्यात येते. यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले होते, त्यामुळे बळीराजाने तीन महिन्यात पीक हाती येत असल्याने बटाटा  लागवड केली होती. गेल्या वर्षी आसमानी संकटामुळे पीक भरात असताना योग्य वेळी पाणी न मिळाल्यामुळे प्लॉट सोडून द्यावे लागले होते. दर तेजीत असूनही  उत्पन्न निघाले नसल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या कर्जबाजारी झाला होता. गेल्या वर्षीच्या कर्जाचे ओझे डोक्यावर असताना यावर्षी समाधानकारक पावसामुळे  शेतकर्‍यांनी धाडसाने बटाटा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती.
यावर्षी शेतकर्‍यांनी एफसी 3, एफसी 5 पेप्सी एटीएल ज्योती या वाणाच्या बियाणाची लागवड केली होती. ज्योतीचे बियाणे 1800 ते 2000 रूपये क्िंवटल तसेच  कंपनीचे बियाणे 2500 ते 2800 रूपये क्िंवटल दराने खरेदी केले होते. औंध परिसरात कंपनी व ज्योती दोन्ही वाणाच्या बियाणाची सुमारे सात ते आठ हजार  एकरावर लागवड करण्यात आली आहे. बियाणे, लागवड, औषधे, काढणीचा खर्च विचारात घेता सरासरी एकरी 50 ते 55 हजार रूपये खर्च आला आहे. पाऊस  जास्त पडल्यामुळे बटाटा पिकावर परिणाम झाला. काही ठिकाणी करपा रोगामुळे पीक हातचे गेले. मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करूनही पीक हाती लागले  नाही.
वातावरण बदलाचा परिणाम पिकावर झाल्याने उत्पादनात घट झाली. गेल्या वर्षी कर्नाटक, उत्तर प्रदेश येथे उत्पादीत बटाट्याची खरेदी करून कंपनी व  व्यापार्‍यांनी साठा करून ठेवला आहे. तसेच पेप्सी कंपनी वगळता अन्य कंपन्या खरेदीसाठी बाजारात उतरल्या नाहीत. दरवर्षी मार्केटमध्ये बटाटा खरेदी करणार्‍या  बालाजी पार्ले या कंपन्या माल खरेदी करत नसल्याने दराची स्पर्धा नाही. त्यामुळे दर नाहीत, मंदीमुळे मार्केटला पाठवलेला माल खपत नसल्याने बटाटा शेतात  पडला आहे.