Breaking News

दुचाकी चोरट्यांची टोळी जेरबंद

सांगली, दि. 25 - सांगलीसह सातारा जिल्ह्यातील तब्बल अकरा चोरीला गेलेल्या दुचाकी वाहनांचा तपास करण्यात तासगांव पोलिसांना यश आले. दरम्यान, याप्रकरणी सातारा जिल्ह्यातील गुरसाळे (ता. खटाव) येथील दोघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती तासगावचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिली. पदवीधर असणारे सुनील भीमराव माने (वय 28) व शशिकांत रवींद्र जाधव (19) अशी त्यांची नांवे आहेत. आणखी काही चोर्‍या उघडकीस येण्याची शक्यता आहे. तसेच या चोरीच्या दुचाकी ज्यांच्याजवळ होत्या, त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. 
19 ऑक्टोबर  रोजी शहरातील बागणे चौकातून दुचाकी (क्र. एम. 50 एएफ 0001) चोरीला गेली होती. याबाबत अभिजित नानासाहेब जाधव (रा. सैदापूर, ता. कर्‍हाड, जि. सातारा) यांनी तासगांव पोलिसात फिर्याद दिली होती. यानंतर शिरगाव येथे एक तरुण चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याचे तासगाव पोलिसांना समजले.
पोलिस निरिक्षक मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सापळा लावून सुनील माने याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता, तासगाव येथून दोन दिरसांपूर्वी आपणच दुचाकी चोरी केली असल्याचे त्याने पोलिसांसमोर कबूल केले.
यावेळी त्याने तासगावसह कर्‍हाड, वडूज, गुरसाळे, सातारा, औंध या ठिकाणाहूनही सव्वातीन लाख रुपये किमंतीच्या मोटारसायकलची चोरी केल्याचे कबूल केले. तसेच त्याच्यासोबत शशिकांत जाधव हाही चोर्‍या करत असल्याचे त्याने सांगितले. शशिकांतला ताब्यात घेतले असता, त्याने पावणेतीन लाख रुपये किंमतीच्या सहा मोटारसायकली चोरी केल्या असल्याचे व त्या सर्व सातारा येथील संस्कार होस्टेलमध्ये ठेवल्या असल्याचे त्याने सांगितले.
यासाठी पोलिस उपनिरिक्षक प्रदीप चौधरी, पोलिस नाईक शैलेंद्र कोरवी, राजेंद्र भिंगारदेवे, हेमंतकुमार ओमासे, सोमनाथ गुंडे, दरिबा बंडगर, कुमार पाटील यांनी काम केले.