Breaking News

वसंतदादा जन्मशताब्दी सोहळ्यास प्रतिभाताई येणार

सांगली, दि. 25 -  वसंतदादांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा प्रारंभ सांगलीत 13 नोव्हेंबर रोजी होणार असून, यासाठी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांच्यासह केंद्र आणि राज्यातील काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
वसंतदादा जन्मशताब्दी समितीची मुंबईत बैठक झाली. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानचे राज्यपाल वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यास 13 नोव्हेंबर रोजी प्रारंभ होत आहे. राज्यात सहकार, सामाजिक, शैक्षणिक चळवळीला प्रोत्साहन देऊन राज्याला विकासाच्या मार्गावर नेणारे मुख्यमंत्री अशी ओळख असलेले वसंतदादांची जयंती पक्षाच्यावतीने राज्यभरात साजरी होणार आहे. त्याचा मुख्य सोहळा येत्या 13 नोव्हेंबरला सांगलीत कृष्णातीरी असलेल्या वसंतदादांच्या समाधीस्थळी होणार आहे. याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने तसेच राज्यभरात दादांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मुंबईत बैठक झाली.
बैठकीस सांगली जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते. ते म्हणाले, सांगलीत 13 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता वसंतदादांच्या समाधीस्थळी अभिवादन, त्यानंतर मुख्य सोहळा होईल. राज्यभरात नागपूर, मुंबई, औरंगाबाद, पुणे या ठिकाणी चार कार्यक्रम वर्षभरात घेण्यात येतील. यामध्ये सहकार, शैक्षणिक आदी विषयांवरील परिषद घेण्यात येणार आहे. जन्मशताब्दी सोहळ्याच्या पहिल्या कार्यक्रमास अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन व्दिवेदी, खासदार अशोक चव्हाण यांच्यासह राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.