Breaking News

चाकू हल्ल्यात दोघे जखमी

सांगली. दि. 27 - शहरातील ख्वॉजा वस्तीत अनैतिक संबंधाच्या संशयावरुन एका महिलेसह दोघांना चाकुने वार करुन जखमी केले. यात महेबूब रफिक शेख  (24) आणि फातिमा अब्दुल रज्जाक शेख (28) हे दोघे जखमी झाले. हा हल्ला फातिमाचा पती अब्दुल (32) याने केला. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. त्यास  अटक केली. 
जुन्या बस स्थानकासमोरील ख्वॉजा वस्तीत अब्दुल शेख आणि त्याची पत्नी फातिमा राहतात. त्यांना दोन मुले आहेत. त्यांच्या घरी काही दिवसांपासून अब्दुल  शेखचा भाचा महेबूब शेख याचे येणे-जाणे आहे. त्यातुनच फातिमा आणि महेबूबचे अनैतिक संबंध निर्माण झाले असल्याचा अब्दुल रज्जाक शेख याला संशय आला.  रात्री अब्दुल याच्या घरी त्याची पत्नी फातिमा आणि भाचा महेबूब हे दोघे बोलत बसले असताना दिसले. त्याने रागाने घरातील चाकू घेऊन प्रथम भाचा महेबूब  याच्या पाठीसह हातावर वार केले. त्यानंतर पत्नी फातिमाच्या हातावर वार करुन तिलाही जखमी केले. फातिमा हिने पोलिस ठाण्यात धाव घेऊन हल्ल्याची  माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी महेबूब आणि फातिमा यांना शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी पाठविले यापैकी फातिमा हिला उपचारानंतर घरी सोडले. पण महेबूब याच्यावर रात्रीच  तातडीची शस्त्रक्रिया केली. त्याच्यावर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत जखमी महेबूब शेख याने मामा अब्दुल रज्जाक शेख (32) याच्याविरुद्ध  शहर पोलिसांत तक्रार दिली.